सर्वंकष अभ्यासाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

नागपूर : जुन्या झालेल्या आणि कोळसाधारित प्रदूषणकारी विद्युतनिर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी कसा करता येईल, यासाठी सर्वंकष अभ्यास करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या परिसरातील नुकत्याच बंद करण्यात आलेल्या नांदगाव ‘फ्लाय अ‍ॅश पॉण्ड’ला त्यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

‘‘नांदगावमधील ग्रामस्थांकडून विशेषत: महिलांकडून आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करून प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आम्ही ठरवले आहे. पुढील १५ दिवसांत नांदगाव ‘अ‍ॅश पॉण्ड’ची जागा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. नांदगावबरोबरच वारेगाव येथील ‘अ‍ॅश पॉण्ड’ कायमस्वरूपी बंद केले जातील’’, असे ठाकरे यांनी स्पष्ट केल़े 

राज्यातील सर्व विद्युतनिर्मिती केंद्रांवर प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येतील. त्याची सुरुवात कोराडी, खापरखेडा येथून होईल. केंद्र सरकारच्या नियमानुसार राखेचा १०० टक्के वापर केला जाईल, याबाबत आम्ही अभ्यास करणार आहोत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्येही राखेचा वापर केला जाईल, असे ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांनी ग्लासगो येथील हवामान परिषदेत (सीओपी२६) २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य जाहीर केल़े  ते गाठण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीनुसार, राज्याची विद्युतनिर्मिती क्षमता १३,६०२ मेगावॉट आहे. त्यापैकी कोळसाधारित औष्णिक विजेचे प्रमाण सुमारे ७५ टक्के म्हणजेच १०, १७० मेगावॉटइतके आहे. राज्याच्या मालकीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, नाशिक, परळी, भूसावळ आणि पारस येथील विद्युतनिर्मिती केंद्रांचा समावेश होतो. 

‘केवळ नाणेफेक झाली, सामना तर होऊ द्या’ 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते काय बोलणार, असे पत्रकारांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता ‘‘आता केवळ नाणेफेक झाली आहे, सामना तर होऊ द्या ’’, अशी सूचक टिप्पणी ठाकरे यांनी केली. त्यामुळे राऊत यांच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

सर्व प्रकल्पांचे अंकेक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सर्व औष्णिक वीज प्रकल्पांचा सर्वंकष अभ्यास केला जाईल. त्यासाठी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचे अंकेक्षण  केले जाईल. जे प्रकल्प विहित मानकांची पूर्तता करत नसतील त्यांना निर्णायक कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रदूषण कमी करण्याबाबतची योजना ठरवली जाईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.