नागपूर: तुम्ही पक्षाचे नाव चोरता, वडील चोरता, चिन्ह चोरता; पण आमची हिंमत तुम्ही चोरू शकत नाही. कोणी कोणावर विश्वास ठेवायचा, हा सध्या मोठा प्रश्न आहे. आता लढायला रणांगणात उतरलो आहे, असे प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नागपुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, लोकशाहीत गुप्त मतदान असते; पण आता आपलेच मतदान आपल्यापासून गुप्त आहे. ते सुरत, गुवाहाटी, गोवा असे फिरतेय. ‘अजातशत्रू’ हा शब्द शिवसेनाप्रमुखांना आवडायचा नाही. ज्याला शत्रू नाही तो कसला मर्द, असे ते म्हणत. शिवसेनेला दगाफटका नवीन नाही. वर्षभरात मध्यावधी होईल, असे वाटते. गद्दारांनी सांगावे ते भाजपच्या उमेदवारीवर लढणार नाहीत, असे आव्हान ठाकरे यांनी विरोधकांना दिले.  

संकटकाळात निष्ठावंत शिवसैनिक बरोबर आहेत याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक ठिकाणी बूथप्रमुख नेमा. आता निवडणुका येतील. संघटना बांधा. मविआ आहे; पण संघटनेकडे दुर्लक्ष करू नका. पुन्हा महावृक्ष बहरून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गद्दारांच्या फलकावर मी काढलेली छायाचित्रे

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, त्यांनी बाळासाहेब पळवले ते समजू शकतो; पण त्यांनी नागपुरात लावलेल्या विविध  फलकांवरही मी काढलेली बाळासाहेबांची छायाचित्रे झळकत आहेत.

वैदर्भीयांची दिलगिरी 

वैदर्भीयांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपण भाजपला मोकळीक दिली होती; पण आता नाही. आता मशाल पेटवलीय. शिवसेना हा विचार आहे. यापुढे आपल्या विचारांचा विजय होईल, असे ठाकरे म्हणाले.

भाजपवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी म्हटले होते, तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य; पण आता खा-खा वृत्ती झाली आहे. पंतप्रधान झाला तरी ग्रामपंचायत तुम्हालाच हवी, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.