नागपूर: अजनी रेल्वे पुलावर दिवसाला जवळपास ५ तास वाहतूक कोंडी होते. सकाळी आणि सायंकाळी येथे रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. या पुलावरील वाहतूक कोंडीवर आतापर्यंत वाहतूक पोलिसांना तोडगा काढता आला नाही, हे विशेष.
अजनी रेल्वे पूल हा दक्षिण आणि पश्चिम नागपूरला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने तेथून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ट्रक जाऊ नये म्हणून मधोमध लोखंडी खांब उभे करण्यात आले. त्यामुळे तेथून केवळ कार व दुचाकी जाऊ शकते. तसेच पुलावर रस्ता दुभाजक म्हणून प्लास्टिकची जाळी लावण्यात आली आहे. पुलावरून धान्य गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. मात्र, ही सर्व उपाययोजना केल्यावरही वाहनांची संख्या अधिक असल्याने पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होते.
हेही वाचा… पावसासाठी लाखांदूरात चक्क बाहुला बाहुलीचे लग्न
रस्ता अरुंद असल्याने सकाळी कार्यालय सुरू होण्याच्या वेळी व सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस कधीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. मुख्यतः सायंकाळच्या सुमारास अजनी पुलावरील कोंडी बघून अनेक वाहनचालक मधूनच मागे परतण्याचा प्रयत्न करतात. परंतु, कारच्या रांगामुळे त्यांना ते सुद्धा शक्य होत नाही.
हेही वाचा… नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी किंवा वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिक वाहतूक पोलिसांवर आगपाखड करीत आपली नाराजी व्यक्त करीत आहेत.
पुलावर पदपाथ असूनही पायी चालण्यासाठी जागाच नाही. पदपाथावर दुचाकी चालवण्यात येत असल्याने पुलावरून पायी चालताना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
कठडे झाले धोकादायक
अजनी रेल्वे पुलावर रस्ता दुभागण्यासाठी मधोमध काही ठिकाणी जाळी तर कुठे प्लास्टिकची जाळी लावण्यात आली आहे. मात्र, प्लास्टिकची जाळी हवेने किंवा वाहनाचा धक्का लागल्यास रस्त्याच्या मधोमध खाली पडते. त्याला वाहन धडकण्याची भीती नेहमीच असते. तसेच लोखंडी कठडे (बॅरिकेड) सुद्धा हवेने खाली पडून अपघात होण्याचा धोका संभवतो.
पोलिसांची पुलाच्या कोपऱ्यावर वसुली?
सकाळी ११ वाजताच्या सुमारास अजनी आणि सीताबर्डी वाहतूक शाखेचे ५ ते ६ कर्मचारी अजनी पुलावरून धान्य गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोपऱ्यात चालान कारवाईच्या नावावर वसुली करीत असल्याचे नेहमीचे चित्र आहे. पोलिसांच्या भीतीपोटी पुलावरून अनेक दुचाकीचालक परत विरुद्ध दिशेने जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. जर वाहतूक पोलिसांनी त्यांची कारवाई पुलाच्या कोपऱ्याऐवजी अन्य जागेवर केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही.
अजनी रेल्वे पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नियोजन केले आहे. परंतु, पूल अरुंद असल्यामुळे सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. – विनोद चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.