नागपूर : सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने शहरातील व्यावसायिकाची साडेतीन कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने दिड महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र सीताबर्डी पोलिसांनी अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.
सुनील बोंडे असे फसवणूक करणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त राहिलेले बोंडे हे सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांनी नागपुरात कार्यरत असताना शहरातील सुपर हायजिनेकी डिस्पोजल्सचे व्यावसायिक अतुल झोटींग यांच्याशी साडेतीन कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. मात्र त्यांनी ही रक्कम परत न केल्याने झोटींग यांनी सप्टेंबर महिन्यात बर्डी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्यावर तक्रार प्राप्त झाल्याचा शेराही दिला. मात्र या प्रकणात आतापर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही.
आरोप असलेले पोलीस अधिकारी एका राजकीय पक्षाच्या खासदाराचा भाऊ आहे. त्यामुळे् पोलिसांवर दबाव येत असल्याने गुन्हा दाखल करण्यात सिताबर्डी पोलीस टाळाटाळ करत आहेत. त्यमुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
पोलीस आयुक्त नॉट रिचेबल
या संदर्भात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना भ्रमणदूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत लघु संदेशही पाठवला. मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. “ या फसवणुकीसंदर्भात पोलीस ठाण्याला सप्टेंबर महिन्यात अर्ज प्राप्त झाला. पोलिसांनी यावर चौकशी करत बयाण नोंदवून घेतले होते. दरम्यान तक्रारदार झोटींग आणि बोंडे यांच्यात तडजोड झाली. यातली काही रक्कम प्राप्त झाल्याचे तक्रारदाराने सांगितले होते. मधल्या काळात झालेल्या तडजोमुळे झोटींग यांनी बयाणावर स्वाक्षरीच केली नाही. वकिलांशी बोलतो असे सांगून झोटिंग निघून गेले. तेव्हा पासून ते ठाण्यात आलेच नाहीत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लांबली. सोबतच आर्थिक तडजोडी बाबतचे शपथपत्रही पोलिसांना प्राप्त झाले नाही. -विठ्ठलसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सीताबर्डी
“ हा व्यावहारिक मुद्दा आहे. गैरमजातून झोटिंग यांनी पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानंतरही त्यांच्याशी झालेल्या व्यवहारातली बरीचशी रक्कम यापूर्वीच दिली आहे. उर्वरित रक्कम येत्या १५ ते २० दिवसांत त्यांना दिली जाईल. ” सुनील बोंडे, सेवा निवृत्त माजी सहाय्यक पोलिस आयुक्त