नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय कुक्कुट विज्ञान संघटना आणि राष्ट्रीय अंडी समन्वय समिती यांच्या सहकार्याने ५००१ अंडी वापरून ‘अंडा भुर्जी’ तयार करण्याचा विक्रम करणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही भुर्जी तयार केली. हा कार्यक्रम रविवारी सकाळी ८ वाजता नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर येथे पार पडला. यावेळी साडेतीन हजार लोक सहभागी झाले होते. पाककृतीनंतर उपस्थितांना ‘अंडा भुर्जी’ पावासोबत खाण्याची संधी मिळाली. विष्णू मनोहर यांचा हा तिसावा विश्वविक्रम आहे. भुर्जी बनवून झाल्यानंतर त्यांना या संदर्भातील प्रमाणपत्र हे देण्यात आले.
फेब्रुवारी २०२५ पर्यंत महाराष्ट्रात १.८ लाखांहून अधिक कुपोषित मुले असल्याची नोंद आहे. त्यापैकी ३० हजारांहून अधिक मुले गंभीर तीव्र कुपोषित म्हणून आणि सुमारे १.५१ लाख मुले मध्यम तीव्र कुपोषित म्हणून वर्गीकृत आहे. कुपोषणाचा सामना करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे नियमित अंडी खाणे हा आहे. ज्याला अनेकदा ‘पूर्ण अन्न’ म्हणून ओळखले जाते, असा दावा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने केला.
नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान अंडी जागरूकता मोहिमा आणि त्यासंबंधित शैक्षणिक कार्यक्रमांची मालिका यशस्वीरित्या आयोजित केली होती. ज्यामध्ये अंड्यांच्या पौष्टिक आणि आर्थिक मूल्यावर प्रकाश टाकण्यात आला. ‘तंदुरुस्ती का फंडाः रोज एक अंडा’ या लोकप्रिय ओळींअंतर्गत शाळा आणि गावांमध्ये अठ्ठावीसहून अधिक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आले. नियमित सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी उकडलेले अंडे वाटप करण्यात आले, अशी माहिती बोंडे यांनी दिली. यावेळी माफसूच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल कुलगुरूंनी सांगितले.
अंड्यामधील गुणधर्म
सुमारे ५५ ग्रॅम वजनाच्या एका अंड्यामध्ये अंदाजे ७२-७८ कॅलरीज, ६.३ ग्रॅम उच्च-गुणवत्तेचे प्रथिने आणि ५ ग्रॅम चरबी असते. तसेच १८६ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल, ०.६ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि ६२ मिलीग्रॅम सोडियम असते. हे कॅल्शियम (२५ मिग्रॅ), फॉस्फरस (९५ मिग्रॅ), पोटॅशियम (६५ मिग्रॅ), आणि लोह (०.९ मिग्रॅ) सारख्या आवश्यक खनिजांचा स्रोत आहे आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, डी, व्हिटॅमिन बी१२ आणि फोलेटसह जीवनसत्त्वे देखील आहेत. तर मेंदूच्या आरोग्यास समर्थन देणारे कोलीनने (१४७ मिग्रॅ) विशेषतः समृद्ध आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत कार्यरत असलेल्या हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने (एनआयएन) प्रतिव्यक्ती वर्षाला किमान १५३ अंडी अंड्यांची आहारात समावेश शिफारस केल्याची माहितीही बोंडे यांनी दिली.