शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरातील महामार्ग ३० तास ठप्प करणारे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू ही सरकारने दिलेली मुदत मान्य केली. तत्काळ कर्ज माफीसाठी आग्रही असलेले कडू कर्जमाफीसाठी पुढच्या वर्षी पर्यंत का थांबले? असा सवाल आता केला जात आहे. आज बच्चू कडू नागपुरात आले, त्यांनी आंदोलक शेतक-यांशी संवाद साधताना याबाबत खुलासा केला.
बच्चू कडू म्हणाले, आजच्या तारखेत कर्जमाफी घेतली असती तर केवळ २०१९ ते २०२४ या आर्थिक वर्षातील थकीत शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला असता. यंदा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची गरज आहे. आज त्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. या शेतकरी बांधवांसाठी ३० जूनपर्यंतच्या कर्जमाफीसाठी वेळ दिली. ३१ मार्चनंतर हे सर्व थकीबाकीदार होऊन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. राज्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांचा सात-बारा यातून कोरा होईल. . काही जणांकडून सोशल मीडियावर या कर्जमाफीच्या मुदतीच्या अनुषंगाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात कुठलेही तथ्य नसल्याचेही कडू यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, शेतकरी नेते शरद जोशी यांच्यानंतर पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात राज्यातील लाखो शेतकरी एका झेंड्याखाली आले. या महाएल्गारमुळे शेतकऱ्यांना परत एकदा आपली ताकद लक्षात आली. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून शेतकऱ्यांसह महाएल्गार पुकारत बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. अमरावती, वर्धा जिल्ह्यातील गावागावांतून मार्गक्रमण करीत हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला. लाखोच्या संख्येतील हे शेतकऱ्यांचे वादळ पाहून सरकारने राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल यांना त बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पाठवले. पण, कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्याशिवाय वाटाघाटी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यातील प्रमुख मंत्री अधिकारी सहृयाद्री अतिथीगृहावर एकवटले. शेतकऱ्यांसाठी मॅरेथॉन बैठक झाली. सरकारने आपल्या व्यूहरचनेतून कमीत कमी शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळेल अशी योजना आखली होती. पण, बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी राज्यातील प्रत्येक गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी योजना ठरविली. सरकारकडून ती मान्य करून घेतली. यातूनच ३० जून २०२६ची तारीख निश्चित झाली.
