नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अखेरच्या टप्प्यात ग्रामीण भागात सोयाबीन आणि कापसाच्या पडलेल्या किंमतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.यावर शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी भाष्य केले आहे. ते करताना त्यांनी विदर्भातील प्रसिद्ध वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेचा आधार घेतला आहे. सोयाबीन आणि कापूस ही विदर्भातील रोख पिके आहेत. सध्या या पिकांना हमीभाव मिळत नाही. अत्यंत कमी दरात व्यापारी ते खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रश्न अडचणीचा ठरू शकतो हे लक्षात आल्यावर सत्ताधाऱ्यांनी सारवासारव सुरू केली.

यावर विदर्भातील प्रसिद्ध शेतकरी नेते व कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून भाष्य केले.या पत्रकात शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांची अत्यंत अर्थपूर्ण कवितेच्या ओळी उद्धृवत केल्या. “ आम्ही मेंढर..मेंढर.. याव त्याने हकलाव… पाच वर्षाच्या बोलीने होतो आमचा लीलाव…” या त्या ओळी आहेत. जावंधिया म्हणतात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात कवितेतील ओळी प्रमाणेच शेतकऱ्यांचे हाल आहे. भाजप-शिंदे गट म्हणतो लाडकी बहीण योजनेचे मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करू तर महाविकास आघाडी म्हणते तीन हजार रुपये महिना देऊ. कापूस, सोयाबीनसाठी केंद्रातील भाजप सरकारने जाहीर केलेला हमी भाव ७५२० (कापूस) व ४८९२ (सोयाबीन) प्रति क्विंटल आहे. पण बाजारात तो मिळत नाही. शेतकरी ६ हजार ते ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलने कापूस व ३६०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीन विकत आहे. शेतकरी संतप्त आहेत.अजून हमीभावाने खरेदी केंद्र सुरू झाले नाही.

हेही वाचा…प्रियंका गांधींना फक्त बघता यावे यासाठी तब्बल चार तासाची प्रतीक्षा

पंतप्रधानांना सवाल, मध्यप्रदेशमध्ये…

शेतकऱ्यांच्या संतापाचा फटका निवडणुकीत बसू शकतो याचा अंदाज आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यास सहा हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी करू, असे आश्वासन दिले. पण मध्यप्रदेशमध्ये भाजपचेच सरकार आहे तेथे सहा हजार रुपयाने खरेदी का नाही, असा सवाल जावंधिया यांनी पत्रकात केला.

राहुल गांधीनाही सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सोयाबीन सात हजार रुपये भाव दिला जाईल. हा भाव हमीभावापेक्षा ४० टक्के अधिक होतो.मग कापसाचे हमी भाव ७५०० पेक्षा ४० टक्के अधिक म्हणजे १०,५०० रुपये प्रतिक्विंटल खरेदीचे आश्वासन राहुल गांधी का देत नाही, असा सवाल जावंधिया यांनी केला.

हेही वाचा…प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मग असेच होत राहील

निवडणुकीनंतर सरकार कोणाचेही येईल. पण या सरकारविरुद्ध शेतकऱ्यांना आंदोलन उभे करावे लागेल.. नाही तर शेतकऱ्यांचा असाच दर पाच वर्षाने ‘लीलाव’ होत राहील, असे जावंधिया म्हणतात.