अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तरीही शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसे मिळेल, हा प्रश्न कायम आहे. कर्जाची थकबाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश बँकांना द्यावेत, त्यामुळे शेतकऱ्यांना आजच प्राणवायू मिळेल, असे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारचे तसेच शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे बच्चू कडू आणि आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचे जावंधिया यांनी आभार व्यक्त केले आहेत. यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अस्मानी संकटासोबतच हमीभाव न मिळण्याचे देखील प्रचंड मोठे संकट आहे. महाराष्ट्र सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर जाहीर केलेली एकतीस हजार कोटींची मदत ही ‘दर्या मे खसखस’ सारखीच आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने बँकेच्या कर्जाची परतफेड केली नाही, म्हणून बँकांनी त्यांना कर्ज दिले नाही.

या थकीत (सर्व नवे आणि जुने) कर्जदारांनी सावकार व कृषी सेवा केंद्रांकडून कर्ज घेऊन या खरीपाची शेती केली. ती अस्मानी संकटाने पूर्ण नष्ट झाली. विदर्भात मराठवाड्या सारखी अतिवृष्टी नाही तरी उत्पादन नाही, एकरी एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादनही नाही. कापसाची तीच स्थीती आहे. बाजारात हमीभाव पण नाही. कर्ज परत कसे करणार? शेतक्रत्यांवर दुहेरी बोजा आहे. बँकेचे थकित कर्ज व सावकार-कृषी सेवा केंद्राचा बोजा. त्यामुळेच त्यांना आजच दिलासा हवा आहे, हा दिलासा कर्जमाफीतून मिळाला असता यात शंकाच नाही. परंतू आता आपण ३० जून २०२६ पर्यंत ती पुढे ढकलली आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे विजय जावंधिया यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने दुष्काळासारखी स्थिती आहे, हे जाहीर केले आहे. कर्ज वसुली थांबवलेली आहे. आता थकित कर्जदारांना त्वरीत नवीन कर्ज देण्याचे आदेश बँकांना दिले, तर त्यांना आजच प्राणवायू मिळेल. ३० जून २०२६ पर्यंत सरकार त्यांचे कर्ज भरणारच आहे. म्हणजे त्यानंतर त्यांच्यावर फक्त नवीन कर्जाचाच बोजा राहील. प्रवीणसिं‍ह परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यातून मुक्त कसे व्हायचे, याचा मार्ग सुचवेल, असे जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे.