अमरावती : शेतकऱ्यांच्या वेदनांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. सध्या पक्षाच्या गुलामीत राहणारे अनेक आमदार आहेत. पक्षाची निष्ठा वगैरे काही नाही. बच्चू कडूंवरही निष्ठा ठेवू नका. आपल्या आई-वडिलांवर निष्ठा ठेवा, आपल्या मायभूमीवर निष्ठा ठेवा. नेत्यांवर निष्ठा ठेवणे आता लोकांनी बंद केले पाहिजे. हे कुणाचेच नाहीत. कुणाचे होऊ शकत नाहीत. ते स्वत:साठीच जगतात. यांच्यासाठी पक्ष प्रिय आहे. सामान्य जनतेच्या हितासोबत यांना काहीही घेणे-देणे नाही, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना केली.
बच्चू कडू म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत. शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागत आहे. सरकारने अजूनपर्यंत एकही खरेदी केंद्र सुरू केले नाही. काय गुन्हा आहे शेतकऱ्याचा. सहा हजार रुपये क्विंटल दराने कापूस विकावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावाच्या वीस टक्के बोनस देऊ असे आश्वासन दिले होते. वीस टक्के बोनस ती मिळालाच नाही. हमीभावापेक्षा कितीतरी कमी किंमतीत सोयाबीन, कापूस विकावा लागत आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहोत. शेतमाल हमीभावापेक्षा कमी किंमतीत विकावा लागतो. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत. तरीही विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, ही शोकांतिका आहे. शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे, तरीही कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, हे दुर्देव आहे.
बच्चू कडू म्हणाले, १९६४ मध्ये नोकरदाराचा पगार १६५ रुपये असताना कापसाला १५० रुपये क्विंटल भाव होता. आज सरकारी नोकरदाराच्या पगार लाखोंमध्ये गेले, पण शेतकऱ्याला एका एकरातून दहा हजार रुपयेही मिळत नाहीत. युरिया अनुदानाचा संदर्भ देत कडू यांनी सांगितले की, २०१० मध्ये ४८३ रुपयात युरिया मिळायचा त्यावेळी कंपनीला दोन हजार रुपये सबसिडी होती, आज कंपनीला ३००० रुपये सबसिडी जाते. म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उद्योगपतींचे बटवे भरले जात आहेत.
बच्चू कडू म्हणाले, २५ लाख गाठी अमेरिकेतून विकत घेतल्या, पण आपल्या शेतकऱ्यांना भाव दिला नाही. हिंदुत्ववादी सरकार दहा वर्षापासून सत्तेत आहे, मग हिंदू धोक्यात कसा?. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या घरात आनंद आला तरच माझे समाधान आहे.
