बुलढाणा: पैनगंगा नदीकाठचच्या विविध गावातील हजारो शेतकरी अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल होतात. मात्र पैनगंगा नदीवर येळगाव नजिक बांधण्यात आलेल्या धरणाचे दरवाजे देखील अडचणीची आणि अप्रत्यक्षरित्या पीक नुकसानीसाठी जवाबदार ठरत आहे . यामुळे आज मंगळवारी हवालदिल शेतकऱ्यांनी सवणा येथे पुराच्या पाण्यात ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.
बुलढाणा शहराला लागून असलेल्या येळगाव धरणावर ८० स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहे. येळगाव धरणात जलसाठा धोक्याच्या पातळीवर गेला किंवा धरण ओव्हरफलो झाले की हे दरवाजे स्वयंचालित पद्धतीने उघडतात. मात्र हे दरवाजे अचानक उघडत असल्याने मोठ्या पुराचा प्रकोप होतॊ. यापरिणामी नदीकाठची उभी पिके तसेच शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. . काल सोमवारी पाडळी महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पैन गंगा नदीला पूर आला. यामुळे धरणाचे दरवाजे आपोआप उघडल्याने नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
या कथित निष्काळजीपणाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी सकाळ पासूनच आंदोलनाला सुरुवात केली. येळगाव धरणावर ८० स्वयंचलित गेट असल्याने दरवर्षी पावसाळ्यात बुलढाणा, चिखली आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धरणातील गेट अचानक उघडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू होतो व नदीकाठच्या शेतात पाणी शिरून उभी पिके वाहून जातात. जमिनीची सुपीक माती खरडली जाते. शेतकऱ्यांनी याआधीच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून उपाययोजनेची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पावसाळ्यात चार गेट कायमस्वरूपी खुले ठेवण्याचे आश्वासन नगर परिषद बुलढाणा यांनी दिले होते. मात्र, याची अंमलबजावणी न झाल्याने एकाचवेळी गेट उघडल्याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर विनायक सरनाईक, नितीन राजपुत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये शिवाजी देवडे, मोजिन पिंजारी, प्रल्हाद देवडे, गणेश भोलाने, समीर जमदार, शरद शेळके, शेख जफर, फिरोज खान पठाण, शेख इस्माईल, शेख रफिक, प्रवीण कस्तुरे, शेख अन्सार, शेख अयाज, शेख सत्तार, शेख इसाक, शेख अशपाक, शिवनारायण पवार, समाधान सुरडकर, भगवान देवरे, दिलीप खेडेकर, प्रकाश पवार, अरुण कस्तुरे, आयुष शेळके आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा आहे की,प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करावी. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील…