लोकसत्ता टीम

भंडारा: सासरा व सुनेमधील भांडण इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात सासऱ्याने सुनेच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार घालून तिची हत्या केली. पिंकी सतीश ईश्वरकर, वय २५ असे मृत सुनेचे नाव आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे घडली. याप्रकरणी बळवंत रघुजी ईश्वरकर, वय ५५ याला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी बळवंत ईश्वरकर याच्या पत्नीचे काही दिवसापुर्वीच निधन झाले होते. तो मुलगा सतिष, सून पिंकी ईश्वरकर व तीन वर्षांच्या नातवासोबत एकाच घरात राहायचा. बळवंतच्या पत्नीच्या निधनानंतर काही दिवसांपासून सासरा व सुनेत नेहमी भांडण होत असल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी पिंकी भांडी घासत असताना सासरा बळवंत याने मागेहून येऊन पिंकीच्या मानेवर कुहाडीने वार केला.

हेही वाचा… अकोला जिल्ह्यात ५८७ एकर क्षेत्रावर गाळयुक्त शिवार; १८ कोटी ८० लाख लिटर जलसाठ्यात वाढ

घटनेच्या वेळी तिचा पती व मुलगा किराणा दुकानात गेले होते, त्यामुळे कुणीही पिंकीच्या मदतीला नव्हते. सुनेवर घाव घातल्यानंतर आरोपी बळवंत हा स्वत:च मोहाडी पोलिस स्टेशनला गेला व हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले. यावेळी पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. याप्रकरणी आरोपी बळवंत ईश्वरकर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.