नागपूर : नागपुरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात असून उर्वरित रस्ते देखील सिमेंटचे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाचवा टप्पा हाती घेण्यात येणार आहे. आवश्यक निधीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना दिले.नागपूरमधील विकासकामे व शहरातील नागरिकांच्या समस्या यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने गडकरी यांनी महापालिका दालनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष संजय मीणा, लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिमेंटच्या पहिल्या चार टप्प्यात झालेल्या आणि सुरू असलेल्या रस्त्यांची माहिती घेतली.

त्यानंतर जे रस्ते उरले आहेत त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. सोबतच त्यांनी रस्त्यांची कामे करताना ती वेळेत पूर्ण करण्याची आणि नागरिकांना असुविधा होऊ नये पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याची, वाहतूक वळण्याची सूचना केली. तसेच रस्त्यांची कामे सुरू असताना होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची सूचना केली. यासंदर्भात जनतेच्या तक्रारी आल्यास संबंधित कंत्राटदार, अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी प्रामुख्याने नागपूर शहरातील मार्केटची सद्यस्थिती, नागपूर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे, नागपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन व प्रोसेसिंगची सद्यस्थिती, शहरातील शुक्रवार तलाव, लेंडी तलाव, नाईक तलाव यांच्या कामाची सद्यस्थिती, शहरातील पाण्याची व्यवस्था महापालिका हद्दीतील १० झोनप्रमाणे करण्याच्या मागणी, मौजा कळमना येथील किराणा मर्चंट असोसिएशनला देण्यात आलेल्या जागेवर प्रकल्प बांधकाम तसेच एन्व्हायर्नमेंट क्लिअरंस साठी मुदतवाढ देणे, नागपूर शहरातील कल्याणेश्वर मंदिराबाबतचा प्रस्ताव, जिल्ह्यातील स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची सद्यस्थिती, शहरातील यशवंत स्टेडियम तसेच सोक्ता भवन कामाची सद्यस्थिती, बाबूळपेठ-उत्तर नागपूर येथे विज्ञान केंद्र स्थापना याविषयावरचर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे शहरातील अग्निशमन व्यवस्थेसाठी पदनिर्मिती व नवीन मशीन विकत घेणे, २०२४मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागांत आलेले पुराचे पाणी, त्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी व त्याअनुषंगाने सुरू असलेल्या कामाची सद्यस्थिती तसेच उपाययोजना, शहरातील टीबी वॉर्डलगत असलेल्या समेकित कौशल विकास पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्रास नियमानुसार लावण्यात आलेला मालमत्ता कर व सेवा शुल्क माफ करणे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, आयआरडीपी अंतर्गत नाले सफाई, वसाहतीतील पावसाळी नाल्यांची सफाई व सर्व गडर लाईनची सफाई, त्याचप्रमाणे रस्त्यावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्यासंदर्भात उपाययोजना, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत शहरातील विविध अभिन्यासातील भुखंडांचे आरएल प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या नियमितीकरणासाठी उपाययोजना या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.