अमरावती : विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून या विभागातील प्रमुख स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी करण्यात आली, ज्यात ४६८ अनधिकृत प्रवासाची प्रकरणे आढळून आली आणि तब्बल २ लाख ९० हजार ९२० रुपये इतका मोठा दंड वसूल करण्यात आला.
प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि रेल्वेच्या उत्पन्नातील गळती थांबावी, या उद्देशाने अमरावती, बडनेरा, अकोला, नांदुरा, जळगाव, भुसावळ, मनमाड आणि खंडवा या महत्त्वाच्या स्थानकांवर ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
५७ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह आरपीएफचे सहकार्य
या कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाने ५७ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे १२ कर्मचारी असे एकूण ६९ कर्मचारी तैनात केले होते. या एकत्रित प्रयत्नांमुळेच एकाच दिवशी ४६८ अनियमित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करणे शक्य झाले.
अनधिकृत विक्रेत्यांवरही कठोर कारवाई
अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यासोबतच रेल्वे परिसरात अनधिकृतपणे वस्तू विकणाऱ्यांवरही विभागाने लक्ष केंद्रित केले. या मोहिमेदरम्यान, रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ अनधिकृत विक्रेत्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेला आणि शिस्तीला बळ मिळणार आहे.
रेल्वेने यापुढेही अशा प्रकारच्या तपासण्या नियमितपणे सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.
दंडाची तरतूद काय?
रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १३८ नुसार कोणत्याही रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. वंदे भारत किंवा इतर कोणत्याही रेल्वेगाडीमध्ये प्रवाशाने तिकिटाविना प्रवास केल्यास त्याला किमान ५०० रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच तुम्ही जिथून प्रवास सुरू केला होता आणि तुम्हाला कुठे जायचे आहे याचे भाडेही भरावे लागेल. यासाठी टीटीई तुम्हाला दंडाची पावती देईल. रेल्वेच्या नियमांनुसार दंड न भरल्यास ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १६४ अन्वये, कोणत्याही रेल्वेगाडीमध्ये ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ घेऊन जाणे हा दंडनीय गुन्हा आहे. यामध्ये दोषीला वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याशिवाय ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर बिडी किंवा सिगारेट ओढल्यास प्रवाशाकडून जागेवरच २०० रुपये दंड वसूल केला जातो.