नागपूर: भारतात प्रौढांप्रमानेच लहान मुलांमध्येही लठ्ठपना, अस्थमा, मधूमेहासह इतरही असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विविध गुंतागुंतीतून मोठ्या प्रमाणावर मृत्यूही होतात. या आजारावर नियंत्रणासाठी युनिसेफने पुढाकार घेत भारतात काही असंसर्गजन्य आजारावरील केंद्र विकसित करण्याचे निश्चित केले आहे. मध्य भारतातील केंद्र नागपूर एम्समध्ये सुरू करण्यात आले आहे.
नागपूर एम्सला या केंद्रामुळे आता येथे असंसर्गजन्य आजाराच्या मुलांवरील उपचारासाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभागाची सोय राहिल. यासाठी युनिसेफकडून एम्सला आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे या केंद्रात आता मध्य भारतातील मधूमेह, लठ्ठपना, अस्थमा, श्वसनाचे आजार, संधीवात, ह्रदयरोग, गतीमंद व मतीमंद, मानसिक आजारासह इतरही असंसर्गजन्य आजारावरील मुलांना नि:शुल्क जागतिक दर्जाची सोय उपलब्ध होणार आहे. युनिसेफकडून या केंद्राला जगातील अद्यावत साधनेही उपलब्ध केली जाणार आहे.
नागपूर एम्सला बुधवारी सदर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी युनिसेफचे भारतातील प्रमुख डॉ. विवेक सिंग, आरोग्य तज्ज्ञ डॉ. मंगेश गधारी यांच्यासह युनिसेफचे विदेशातीलही काही प्रतिनिधींनी भेट दिली. याप्रसंगी प्रामुख्याने बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. पी. पी. जोशी आणि इतरही उपस्थित होते. मुलांमधील या आजारावर नियंत्रणासह रुग्णांवर वेळीच उपचार सुरू केल्यास ते प्रौढ झाल्यावर मोठा धोका टळणे शक्य असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. याप्रसंगी एम्सच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. आसाश बंग आणि इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नऊ राज्यात केंद्र होणार- डॉ. विवेक सिंग
महाराष्ट्रातील नागपूर एम्ससह नऊ राज्यात युनिसेफ विविध संस्थांच्या मदतीने असंसर्गजन्य आजारावरील अगद्यावत केंद्र स्थापन करणार आहे. येथे मुलांना असंसर्गजन्य आजारावरील अद्यावत उपचार मिळेल. त्यातून मुलांवर अचूक उपचारासह भविष्यातील त्यांची गुंतागुंत कमी होऊन मृत्यू कमी होईल, असे मत युनिसेफच्या भारतातील प्रमुख डॉ. विवेक सिंग यांनी व्यक्त केले.