गोंदिया : स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर व राजकुमार बडोले वगळता नेहमी इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून गोंदिया जिल्ह्याला लाभले आहेत. त्यामुळे उसणवारीच्या पालकमंत्र्यांवरच गोंदिया जिल्ह्याची भिस्त दिसून आली. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत चार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी काही निवडक जिल्ह्यातील पालकमंत्री यांची यादी जाहीर केली. त्यात गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचे धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आघाडी आणि युती कुणाचेही शासन असो गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री यांची संगीतखूर्ची सातत्याने सुरूच आहे. १९९९ या वर्षी जिल्हा निर्मितीपासून बाहेरील जिल्ह्याचा पालकमंत्री ही जणू काही काळ्या दगडावरची रेषच ठरली आहे.

हेही वाचा – मेडिकल-मेयो मृत्यू प्रकरण : वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी माहिती मागितली

जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा कार्यकाळ पाहता स्थानिक नेतेमंडळींना भोपळाच अधिक मिळाला आहे. मागील काळात डोकावल्यास केवळ १९९५ च्या युती शासनात आमगावचे महादेवराव शिवणकर आणि २०१४ च्या युती शासनात सडक अर्जुनीचे राजकुमार बडोले या दोन नेत्यांनाच हे पद भुषविता आले आहे. त्या व्यतिरीक्त गोंदिया जिल्ह्याला कधीही स्थानिक पालकमंत्री लाभलेला नाही. त्यातही २०१९ चे मविआ शासन ते आजची महायुतीपर्यंत मागील ४ वर्षांत गोंदिया जिल्ह्याला अनिल देशमुख, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे, सुधीर मुनगंटीवार ते आता विद्यमान धर्मराव बाबा आत्राम असे ४ वर्षांत ५ पालकमंत्री आणि त्यातही कुणी स्थानिक नाही.

हेही वाचा – वर्धा : महामार्गावर लुटमार! तोतया पोलिसांची आंतरराज्यीय टोळी

विशेषत: आघाडी शासनाच्या काळात कधीच स्थानिक नेत्यांना हा मान मिळाला नसताना काधीकाळी युती शासनकाळात स्थानिक पालकमंत्री लाभले होते. मात्र, आता युती शासन काळातही जिल्हावासियांचा भ्रमनिराश झाल्याचे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रफुल पटेलांनी भाकरी फिरवली

शिंदे -फडणविस या सरकारमध्ये २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट समाविष्ट झाला. त्या दिवसापासूनच गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणार आणि प्रफुल पटेल आपल्या पक्षातील पालकमंत्री येथे आणणार ही चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होती. त्याला आज धर्मराव बाबा आत्राम यांच्या पालकमंत्रीपदी झालेल्या नियुक्तीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. प्रफुल पटेलांनी सत्तेत सहभागी होताच आपला राजकीय वट दाखवून भाकरी फिरवली अन् गोंदिया जिल्ह्यात आपल्या पक्षाचा पालकमंत्री मिळवला, अशा चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत.