नागपूर : चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या पाच महिला विक्री प्रतिनिधींनी संगनमत करून मालकाची फसवणूक करीत चार वर्षात ७४ लाख २५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागीने चोरून नेले. सराफाने एकूण चार वर्षांचा लेखाजोखा तपासला असता ही बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी पाचही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्वाती लुटे, प्रिया राऊत, पूजा भनारकर, भाग्यश्री इंदलकर आणि कल्याणी खडतकर अशी गुन्हा दाखल झालेल्या महिला विक्री प्रतिनिधींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू दीपक चिमुरकर (२८, रा. नागमोडी ले आऊट, रेशीमबाग) यांचे इतवारी सराफा मार्केटमध्ये चिमुरकर ब्रदर्स नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात आरोपी तरुणी स्वाती लुटे, प्रिया राऊत, पूजा भनारकर, भाग्यश्री इंदलकर आणि कल्याणी खडतकर या विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरीवर होत्या. २०१९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान चिमुरकर यांच्या दुकानातील ७४ लाख २५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागीने या तरुणींनी आपसांत संगनत करून चोरी केले. ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक शंतनू चिमुरकर यांनी तहसिल पोलिसात तक्रार दिली. तहसिल पोलिसांनी पाचही विक्री प्रतिनिधी तरूणींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

हेही वाचा >>>“…तर धनगर समाज ‘हे’ स्वत:च करून दाखवेल…” गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चांदीच्या अंगठ्यांपासून चोरी

स्वाती आणि पूजा या दोघी अनेक दिवसांपासून सराफा दुकानात काम करीत असल्यामुळे त्यांच्यावर मालकाचा विश्वास होता. दोघींनाही ओळखीच्या कुणालातरी चांदीच्या अंगठ्या भेट द्यायच्या होत्या. दोघांनीही दोन अंगठ्या चोरल्या. कुणालाही माहिती होत नसल्यामुळे त्यांनी भाग्यश्री, प्रिया आणि कल्याणी यांनाही आपल्या टोळीत सामिल करून घेतले. पाचही जणींनी सराफा दुकानातील दागिने चोरण्याचा सपाटा लावला. पाच वर्षांत तब्बल ७४ लाख २५ हजारांचे दागिने चोरी केल्याचा आरोप आहे.