नागपूर : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात पून्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील काही तालुके पूराच्या तडाख्यात सापडले असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. नागपूरसह विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.

मागील संपूर्ण आठवडा तसेच या आठवड्यात देखील मंगळवारपर्यंत विदर्भ पूरमय झाला होता. गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पाऊस पुन्हा परतल्याने नदीपरिसरातील नागरिकांना धडकी भरली आहे. वर्धा जिल्हा मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा प्रभावित झाला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीला पूर आल्यामुळे अलमडोह ते अलीपूर रस्ता बंद झाला आहे. मनेरी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आर्वी ते तळेगाव हा अमरावती व नागपूरला जोडणारा राज्यमार्ग ठप्प पडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारसवाडा ते सुजातपूर, मोर्शी ते आष्टी हे मार्ग बंद पडले. वाघाडी नाल्याचे पाणी लहान आर्वी गावात शिरले. आष्टी तालुक्यातील साहूर नदीला पूर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चंद्रपूर-मुल रस्ता चिचपल्ली गावाजवळ बंद आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील नऊ रस्ते बंद करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे.