लोकसत्ता टीम

नागपूर: नागपुरात गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना बघण्यासाठी अनेक विदेशी पाहुणे शहरात दाखल झाले आहेत. या शहरातील खाद्य संस्कृती देश- विदेशात लोकप्रिय आहे. सामन्याच्या निमित्ताने आलेल्या विदेशी पाहुण्यांनाही भुरळ घातली. त्यांनी येथील विष्णू की रसोईमध्ये भारतीय महाराष्ट्रीयन मराठमोळ्या भोजनाचा स्वाद घेतला.

पाहुण्यांचे स्वागतही नागपूरची जगात ओळख असलेल्या नागपुरी संत्र्यांची माळ घालून करण्यात आले. त्यांच्यसोबत असलेल्या महिलांचेही मराठमोळ्या संस्कृतीला साजेसे स्वागत झाले. यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते.या सर्वांनी विष्णू की रसोई मध्ये महाराष्ट्रीयन विविध व्यंजनाचा स्वाध घेतला. आदरतिथ्य आणि विविध व्यंजनामुळे पाहुणे भारावून गेले. विष्णूकी रसोई ही घरगुती व महाराष्ट्रीयन भोजनासाठी प्रसिद्ध आहे. येथे यापूर्वीही अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने विदेशी पाहुण्यांनी येथे हजेरी लावली आहे.

नागपुरात अनेक वर्षांनंतर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्याने नागपूरकर क्रिकेट रसिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली. अनेकांना तिकीट मिळाले नाही. तिकीट काळ्याबारात विकल्या गेले. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुध्दा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन कोंडीमुळे क्रिकेट प्रेमींना त्रास

नागपुरात क्रिकेट सामना असला की ट्राफिक जाम आलेच. पण सामान्यपणे सामना संपल्यावर वाहनकोंडी होते. शुक्रवारी तर सामना सुरू होण्यापूर्वीच जामठाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनकोंडी पाहायला मिळाली. हजारोंच्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने मैदानाकडे जात असल्याने ही परिस्थिती उद्भवली. पोलिसांनी केलेले नियोजनही कोलमडले. याचा फटका बाहेरगावहून नागपूरकडे येणाऱ्या तसेच नागपूरहून बाहेरगावी जाणाऱ्यां वाहनांना झाला. या कोंडीत प्रवासी वाहनेही अडकली होती.