नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला हल्ला बनावट होता, असा धक्कादायक उलगडा न्यायवैद्यक चाचणीमधून झाला आहे.यासंदर्भात ग्रामीण पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अंतिम अहवाल दाखल केला आहे. पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या या अहवालामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दगड जर कुणी मारला असता तर तो कारच्या मधल्या किंवा मागच्या सीट वर आदळला असता. पण प्रत्यक्ष घटनेचा वेळी दगड हा देशमुख बसलेल्या पुढच्या सीटवर होता, असेही या ग्रामीण पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. देशमुख हे १९ नोव्हेंबर २०२४ ला कारमध्ये बसून नरखेड मार्गे काटोलला जात होते. दरम्यान, बैलफाटा परिसरात चार जणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. त्यामुळे देशमुख यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर हल्लेखोर आपल्या विरोधात आणि भाजपाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या समर्थनात नारे देत फरार झाले, असा आरोप देशमुख यांनी स्वतः दिलेल्या तक्रारीतून केला होता.
निवडणुकीच्या काळातच हा हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. ग्रामीण पोलिसांना देशमुख यांच्या कारमध्ये जे दोन दगड आढळले त्यातला एक कारच्या बोनेटवर तर, दुसरा कारच्या आतमध्ये सापडला होता. ते दगड न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठविण्यात आले. घटनेची पुनरावृत्ती करून पाहण्यात आली. त्यावरून हल्ल्याची घटनाच घडली नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या याच अहवालावरून ग्रामीण पोलिसांनी न्यायालायला अंतिम अहवाल सादर केला.
देशमुख यांनी स्वतः केली होती पोस्ट
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावरून परत येत असताना १९ नोव्हेंबर २०२४ ला कारवर हल्ला झाल्याची तक्रार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः दिली होती. देशमुख यांनी जखमी अवस्थेतला व्हिडिओ समाजमाध्यमांवरही टाकला होता. मात्र या प्रकरणी कुठलाही पुरावा मिळत नसल्याचेही पोलिसांनी अहवाल नमूद केले आहे. कारची काच एका झटक्यात कशी फुटू शकते, असा सवालही यातून उपस्थित करण्यात आला आहे.
