नागपूर : ओबीसी आणि मराठा समाजाचे महाराष्ट्रात प्रगतीत मोठे योगदान आहे. या दोन समाजात कुटुता निर्माण होणे राज्याच्या हिताचे नाही. ही कुटुता निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोघांचीही आहे, असे मत वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. शनिवारी लोकसत्ता कार्यालयाला मुनगंटीवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून झालेल्या जाळपोळीबाबत कठोर वक्तव्य केले होते. त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यावर विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा व ओबीसींचे हक्काचे आरक्षण अबाधित ठेवण्याचा शब्द दिला आहे. त्यावर सर्वानी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. परंतु त्याबाबत साशंकता निर्माण करून दररोज नवीन बाबी समोर आणणे अयोग्य आहे. मराठा, ओबीसी एकत्र आले नाहीत तर कुटुता वाढत जाईल. ते महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधक ठरेल.
हेही वाचा >>>ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघाचा सांगाडा सापडला; ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या चर्चेला उधाण
मराठा आरक्षण आम्ही दिले होते. परंतु ठाकरे सरकारने ते टिकवले नाही. सर्वोच्च न्यायालयाने काही त्रुटी काढल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारची पुढची दीशा ठरण्यास मदत होणार आहे. न्या. भोसले यांच्या समितीमुळे मराठा समाजास कुणबी जातीचे दाखले आडमार्गाने मिळतील, असा गैरसमज काही लोकांचा आहे. काही लोकांना आरक्षणाचा मुद्दा हा सत्तेचा दुष्काळ संपवण्याचा मार्ग वाटतो आहे, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
‘वृद्ध कलावंतांचा मानधन वाढवण्याचा प्रस्ताव’
राज्यातील सांस्कृतिक वातावरणाबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, नाटय़गृह उभारण्याची जबाबदारी राज्य सरकारची नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तरीही काही जिल्ह्यातील अर्धवट बांधकाम झालेल्या नाटय़गृहांचे काम लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारकडे वृद्ध कलावंतांचा मानधन वाढवण्याचा प्रस्ताव आला आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.