लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून तेली समाजाचा उमेदवार द्या, अन्यथा वेगळी भूमिका घेवू, अशी मागणी करणारे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक देवतळे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली तेव्हापासूनच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी पूर्व विदर्भात काँग्रेसने वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया किंवा चंद्रपूर या चार लोकसभा मतदार संघापैकी एक जागा काँग्रेस पक्षाला सोडावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती. मात्र, देवतळे यांच्या मागणीकडे पटोले व खरगे यांनी साफ दुर्लक्ष केले.

आणखी वाचा-यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

दरम्यान भाजपने वर्धेतून तेली समाजाचे नेते खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिली. त्यानंतर देवतळे यांनी तेली समाजाकडून उमेदवारी मागणारे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे यांच्यासह दिल्लीवारी करून काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र देवतळे यांच्या हाती निराशा आली. शेवटी देवतळे यांनी नाराज होवून शुक्रवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला. त्यानंतर देवतळे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जाऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला.

पाऊणकरही लवकरच भाजपवासी?

देवतळे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती केली होती. या युतीमुळेच देवतळे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद गमवावे लागले होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा कुणबी समाजाचे नेते मनोहर पाऊणकर लवकरच भाजपवासी होणार अशी चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. विशेष म्हणजे कधीकाळी काँग्रेस पक्षात सक्रीय असलेले पाऊणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते.