लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यातील रेतीघाट माफियांच्या गुंडगिरीचे केंद्रस्थान होत असल्याची घटना महागाव तालुक्यात उजेडात आली. तालुक्यातील भोसा रेती घाटावर वर्चस्वाच्या वादातून गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी रेती माफियांनी हवेत गोळीबार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी २० ते २५ राउंड फायर झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चार राउंड रिकामे, तर दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपीससह २० ते २५ जण फरार असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील भोसा व आर्णी तालुक्यातील साकुर घाटाच्या रस्त्यावरून रेती उपसा आणि वाहतुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. रात्रीच्या अंधारात हवेत गोळीबार करण्यात आला. मुख्य आरोपी अंजुम लाला याने फिर्यादीला घटनास्थळावर दमदाटी करून मारहाण केली व गोळीबार केल्याची फिर्याद सुरेश ऊर्फ कृष्णा ढाले यांनी महागाव पोलिसांत दाखल केली. या तक्रारीवरून अंजूम लाला व २० ते २५ जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळावरून एक कार, सहा मोटरसायकल जप्त केल्या. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

आणखी वाचा-डॉक्टरांनाही निवडणुकीच्या कामात जुंपले… अखेर वैद्यकीय शिक्षक संघटनांनी…

महागाव येथील सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे हे रात्री कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड रात्रीपासूनच घटनास्थळी ठाण मांडून आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार केली. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना रात्रीच अटक केली. आरोपीविरुद्ध विविध कलामनव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.