Naxalism / गडचिरोली : काही दिवसांपूर्वी गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये जहाल नक्षल नेता भूपती आणि रुपेशने २७० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. त्यानंतर नक्षल संघटनेने या सर्वांना गद्दार ठरवले. यावर रुपेशने चोख प्रत्युत्तर देत, ‘आम्ही गद्दार नसून, खुद्द केंद्रीय नेतृत्वानेच दिवंगत महासचिव बसवराजू यांच्या भूमिकेशी प्रतारणा केली,’ असा खळबळजनक आरोप केला आहे.
रुपेशने जारी केलेल्या चित्रफितीत आत्मसमर्पणाची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट केली असून हा निर्णय अचानक किंवा पोलिसांशी संगनमत करून घेतला नसल्याचा दावा केला आहे. रुपेशच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात खुद्द नक्षलवादी चळवळीचे दिवंगत महासचिव बसवराजू (बीआर दादा) यांनी केली होती. सध्याची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून सशस्त्र संघर्ष थांबवून सरकारशी चर्चा करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत बसवराजू यांनी त्यांच्या निधनापूर्वी मे २०२५ मध्ये मांडले होते.
बसवराजू यांनी मरण्यापूर्वी आपली भूमिका बदलली होती. हा केंद्रीय समितीचा दावा संपूर्णपणे खोटा आणि जाणीवपूर्वक पसरवलेला आहे. बसवराजू यांनी शेवटच्या क्षणी लिहिलेली पत्रे, ज्यात त्यांनी शांतता चर्चेच्या निर्णयाचे समर्थन केले होते, ती पत्रे जाणीवपूर्वक इतर सहकाऱ्यांपासून लपवण्यात आली, असा आरोप रुपेशने केला.
बसवराजू यांच्या निधनानंतर, देवजी याच्यासारख्या काही नेत्यांनी या शांतता प्रक्रियेला विरोध केल्याचा दावाही त्याने केला. आत्मसमर्पणाचे समर्थन करताना रुपेश म्हणाला, आज संघटना अत्यंत वाईट स्थितीत अडकली आहे. नेतृत्वाकडे कोणताही दुसरा मार्ग शिल्लक नाही. अशा स्थितीत आमच्या सहकाऱ्यांना एक एक करून मरताना पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे हतबल होऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
तुम्हाला आमचे लोक मरताना पाहायचे का?
शहरांमध्ये बसून या निर्णयाची चिकित्सा करणाऱ्या बुद्धिजीवी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवरही सडकून टीका केली. तुम्ही लोक एसी रूममध्ये बसून आम्हाला गद्दार ठरवत आहात, पण जमिनीवरील वास्तव तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त आमचे लोक मरताना पाहायचे आहेत का, असा संतप्त सवाल त्याने विचारला.
केंद्रीय समिती स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आम्हाला ‘बळीचा बकरा’ बनवत असल्याचा आरोप करत, आपण आजही बसवराजू यांनी सुरू केलेली शांतता चर्चा पुढे नेण्यास तयार आहोत, असेही त्याने नमूद केले.
मागील एका महिन्यात नक्षलवादी चळवळीला महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये मोठा हादरा बसला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच, वरिष्ठ नेता मल्लोझुला वेणुगोपाल राव (सोनू) याने आणि त्यानंतर रुपेशच्या नेतृत्वात २७० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. चळवळीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शरणागती आहे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये आत्मसर्पणाची लाट आली असून दोन दिवसात काही मोठ्या नेत्यांसह ७० सशस्त्र नक्षल यांनी आत्मसमर्पण केले आहे.
