गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, वांगेतुरी पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांच्याकडील २६ भरमार बंदुका आणि ११ बंदुकीचे बॅरल स्वेच्छेने पोलिसांच्या स्वाधीन केले. यामुळे नक्षलवादी चळवळ संपुष्टात येत असताना, नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास दृढ होत असल्याचे मानले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा मोठा भाग जंगलव्याप्त असून, येथील दुर्गम भागातील नागरिक पारंपारिकरित्या शिकारीसाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी वडीलोपार्जित बंदुका बाळगतात. मात्र, नक्षलवादी अनेकदा याच परिस्थितीचा फायदा घेऊन सामान्य जनतेला चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असत. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील एकही तरुण नक्षलवादी चळवळीत भरती झालेला नाही आणि जिल्ह्यात मोजकेच सशस्त्र नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांजवळील बेकायदेशीर शस्त्रे व बंदुका स्वच्छेने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन कराव्यात, असे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत, पोस्टे वांगेतुरी हद्दीतील मौजा हिंदुर, नैनवाडी आणि तोडगट्टा येथील नागरिकांनी स्वतःहून पुढे येत २६ भरमार बंदुका व ११ बॅरल पोलिसांकडे जमा केले. उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर यांच्या नेतृत्वात, तसेच वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे आणि सिआरपीएफच्या अधिकारी व जवानांनी राबवलेल्या प्रभावी ‘नागरी कृती उपक्रमां’मुळे नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षात शस्त्रे जमा करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये ७३, २०२३ मध्ये ४६, २०२४ मध्ये २६ आणि सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण २९ भरमार बंदुका नागरिकांनी जमा केल्या आहेत. आजपर्यंत एकूण ३६५ भरमार बंदुका पोलीस दलाकडे स्वाधीन करण्यात आल्या आहेत.
इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रे जमा होणे, हे नागरिक आता नक्षलवादाच्या भयापासून मुक्त होत असल्याचे आणि त्यांचा पोलीस दलावरील विश्वास वाढल्याचे दर्शवते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदारांचे, तसेच पोलीस दलावर विश्वास दाखवून शस्त्रे स्वाधीन करणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
