गडचिरोली : बंदुकीच्या जोरावर आयुष्य जगणारे आणि नंतर हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेले आत्मसमर्पित नक्षलवादी आता शिक्षणाच्या वाटेवर चालू लागले आहेत. गडचिरोली पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या अभिनव उपक्रमामुळे त्यांना साक्षरतेची संधी मिळाली असून, त्यांच्यासाठी रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे मार्ग उघडले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमा व शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे आतापर्यंत ७१६ नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले आहेत. मात्र त्यापैकी बहुतांश शिक्षणापासून वंचित राहिलेले होते. कोणी चौथी, तर कोणी पाचवीपर्यंतही शिकले नव्हते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या प्रशिक्षणासाठी किमान पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याने ही संधी त्यांना मिळणे अशक्य होते.
याच अडचणीचा विचार करून गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत विशेष साक्षरता मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत चाललेल्या या मोहिमेत १०६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी सहभाग घेतला. या काळात त्यांना अक्षरओळख, शब्दरचना, मूलभूत गणितासह डिजिटल साक्षरतेचे धडे देण्यात आले.
२१ सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. एकूण ४२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची साक्षरता चाचणी घेण्यात आली. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यामुळे ते पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी पात्र ठरतील. पुढील टप्प्यात आठवी व दहावीच्या परीक्षेसाठी स्वतंत्र वर्गांचे आयोजन करण्याचीही योजना आहे.
या उपक्रमामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना केवळ शिक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तर नव्याने उभे राहण्याचा आत्मविश्वासही मिळत आहे. जंगलाच्या वाटा सोडून समाजात पुन्हा सामील होणाऱ्यांसाठी हा प्रयत्न नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे. पोलीस, जिल्हा परिषद अधिकारी, शिक्षक आणि इतर संबंधितांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘प्रोजेक्ट संजीवनी’ला यश मिळाले आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अशा उपक्रमामुळे पुनर्वसन प्रक्रियेला नवे बळ मिळाले आहे. बंदुकीऐवजी पेन हातात घेणाऱ्या या माजी नक्षलवाद्यांचा प्रवास केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बदल घडवणारा नाही, तर समाजालाही नव्या दिशेने घेऊन जाणारा आहे. हिंसाचाराचा अंधार मागे टाकून शिक्षणाचा उजेड स्वीकारणाऱ्यांच्या आयुष्यात हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरत आहे.