गडचिरोली : वरिष्ठ नक्षलवादी नेता भूपती उर्फ सोनूने १५ ऑक्टोबरला आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले होते. त्याच गटातील केंद्रीय समिती सदस्य रुपेश याच्यासह आणखी तब्बल २०८ नक्षलवाद्यांनी १५३ अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह छत्तीसगड मधील जगदलपूर येथे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करल्याने नक्षल संघटनेला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
जगदलपूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ‘पुना मरगेम’ (नवी पहाट, नवा रस्ता) या नावाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत हे सर्वजण समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. यावेळी भारतीय संविधानाची प्रत आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये केवळ संख्येचेच नव्हे, तर चळवळीतील महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांची संख्या मोठी असल्याने बस्तर विभाग पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याचा दावा केला जात आहे.
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये केंद्रीय समिती सदस्य रुपेश ( ४५, तेलंगणा) याच्यासह दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे चार प्रमुख सदस्य भास्कर उर्फ राजमन मंडावी, माड डिव्हिजनची प्रमुख रनिता, राजू सलाम आणि धन्नू वेत्ती उर्फ संतू यांचा समावेश आहे. याशिवाय विभागीय समितीचे २१ सदस्य, एरिया कमिटीचे ६१ सदस्य आणि ९८ सदस्यांनी एकाच वेळी हिंसेचा मार्ग सोडला आहे. भूपतीचा समर्थक आणि गेल्या तीन दशकांपासून चळवळीत सक्रिय असलेल्या आणि रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपेशने आत्मसमर्पण करण्यापूर्वी एक व्हिडिओ संदेश जारी करून आपल्या सहकाऱ्यांना बदललेली परिस्थिती आणि आत्मसमर्पणामागील कारणे समजून घेण्याचे आवाहन केले होते.
‘त्या’ बैठकीत ठरला ‘प्लॅन’
गडचिरोलीतही दोन दिवसांपूर्वी पॉलिट ब्यूरो सदस्य मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपतीने ६० जणांसह आत्मसमर्पण केले होते. तत्पूर्वी अबुजमाड आणि गडचिरोलीच्या सीमा भागात भूपती, रुपेश याच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती. यात आत्मसर्पणासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत ठरल्याप्रमाणे भूपती काही सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांकडे शरण आला तर रुपेशला छातीसगडमध्ये आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. याबैठकीत मतभेद देखील झाले होते. त्यामुळे काही नक्षल्यांनी आत्मसमर्पणास नकार देत जंगलाची वाट धरली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येता काही दिवसात आणखी नक्षलवादी आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे.