गडचिरोली : परिस्थिती माणसाला घडवते, या उक्तीचा प्रत्यय चामोर्शी तालुक्यातील वाकडी या छोट्याशा गावातील एका शेतमजूर कन्येने आणून दिला आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, आई-वडील दोघेही भूमिहीन शेतमजूर; पण शिक्षणाची प्रचंड आवड आणि समाजात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, याच जोरावर शारदा रवींद्र दुगुनलावार हिने देशातील नामांकित ‘शिव नाडर युनिव्हर्सिटी, दिल्ली’ (एनसीआर) येथे ‘एमए इन रुरल मॅनेजमेंट’ या प्रतिष्ठेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठी तिला तब्बल ११ लाखांची शिष्यवृत्तीही मंजूर झाली आहे. तिचा हा प्रवास थक्क करणारा आणि असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
शारदाची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य आहे. कुटुंबाकडे स्वतःची शेती नसल्याने आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत शारदाने आपले प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) गावातीलच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पूर्ण केले. त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण प्रबुद्ध हायस्कूल, मुरखळा (चक) येथे आणि अकरावी-बारावीचे शिक्षण चामोर्शी येथील शिवाजी जुनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले.
बारावीनंतर तिच्या शैक्षणिक वाटचालीला निर्णायक वळण मिळाले. डॉ. पंकज नरुले यांनी तिची शिक्षणाची तळमळ ओळखून तिला पुढील दिशा दाखवली.
केवळ शारदालाच नव्हे, तर तिच्या आई-वडिलांनाही समुपदेशन करून त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. याच मार्गदर्शनातून शारदाने नागपूर येथील मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क येथून ‘बीएसडब्ल्यू’ (बॅचलर ऑफ सोशल वर्क) पदवीचे शिक्षण घेतले. येथेही तिने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून तिने गुणवत्ता यादीत पाचवे स्थान पटकावले.
नागपूरसारख्या शहरात राहून शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. यावेळी ठाणे येथील ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या संस्थेने तिच्या पदवी आणि पुढील शिक्षणासाठी मोलाची शैक्षणिक व आर्थिक मदत केली. दरम्यानच्या काळात शारदामध्ये सामाजिक क्षेत्रातील आवड आणि चिकाटी अधिक दृढ झाली. या संपूर्ण प्रवासात ‘संकल्प फाऊंडेशन’चेही तिला मोठे मार्गदर्शन लाभले.
‘बीएसडब्ल्यू’ पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या ध्येयाकडे अधिक गांभीर्याने वाटचाल सुरू केली.
तिने ‘शिव नाडर युनिव्हर्सिटी’साठी प्रयत्न केले. ही युनिव्हर्सिटी ‘इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स’ म्हणून गौरविली गेली असून, भारतातील अव्वल दर्जाचे संशोधन आणि शिक्षण देणाऱ्या खासगी विद्यापीठांपैकी एक मानली जाते. अशा प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी तिने प्रवेश परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखत अशा कठोर निवड प्रक्रियेला यशस्वीपणे सामोरे जात ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस’मधील ‘एमए इन रुरल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमासाठी आपली निवड निश्चित केली.
आपल्या भागातील आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक समस्या तिने जवळून पाहिल्या आहेत. याच समस्यांवर काम करून आपल्या भागात परिवर्तन आणि विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने तिने या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. एका शेतमजुराच्या कन्येने घेतलेली ही गगनभरारी निश्चितच वाकडी गावाचाच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढवणारी आहे.
