बुलढाणा : बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाट रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एकट्या दुकट्या प्रवाश्यासाठी धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी राजूर घाटात काही असामाजिक तत्वांचा वावर असतो. संधी साधून ते प्रवाश्याची लुबाडणूक करतात. अशाच एका घटनेत जळगाव जिह्यातील एका प्रवाश्याची लूटमार करण्यात आल्याची घटना घडली.
रात्री एका दुचाकीस्वारास अज्ञात तिघांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विनोद शिवा मोहिते असे लूटमार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जळगाव (खान्देश) जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी येथील रहिवासी आहे. विनोद मोहिते हे काल दुपारी २ वाजताचे सुमारास मराठवाड्यातील जालना येथे काही कामानिमित्त गेले होते. यानंतर मोहिते जालना येथून त्यांच्या गावी धाबे पिंपरी मोटरसायकल ( क्रमांक एमएच १९ इ ३९६३ )ने निघाले होते.
रात्री अंदाजे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ते राजूर घाटातील बालाजी मंदिराच्या वळणावर मोटरसायकलवरुन खाली पडले. त्यामुळे ते जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. यावेळी तिथे आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत त्यांच्या जवळील नगदी ३२०० रुपये, ६० हजार रूपये किमतीची दुचाकी, असा अंदाजे ७२ हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. अज्ञात चोरटे मलकापूरच्या दिशेने पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक रवी मोरे हे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस चौकीचे काय?
दरम्यान मागील काळात गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता राजूर घाटात एक पोलीस चौकी उभारण्यात आली होती. यामुळे अश्या घटनाना आळा बसला होता. मात्र सध्या ही चौकी बंद आहे. यामुळे ही चौकी सुरु करून राजूर घाटात गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.