नागरिकांमध्ये भीती; साक्षीदार मिळविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

राणा बंधूंचा खून केल्यानंतर प्रशांत अर्जुन चमके याने लोकांनी साक्ष दिल्यास कारागृहातून बाहेर पडल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या दहशतीमुळेच घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांना साक्षीदारांची जुळवाजुळव करण्यासाठी पायपीट करावी लागत असून वस्तीतील नागरिक साक्ष देण्यासाठी तयारी दर्शवित नसल्याची माहिती समोर येत आहे. यावरून चमके हा कोठडीत असतानाही त्याची समतानगर परिसरात दहशत असल्याचे स्पष्ट होते.

प्रशांत चमके आणि त्याच्या कुटुंबीयांनी रविवार, १२ जूनला सकाळी ९ वाजता इमरतलाल राणा आणि पूरणलाल राणा यांचा तलवार आणि चाकूने खून केला. या दोघा भावांवर वार केल्यानंतर त्यांना वस्तीतील नागरिकांनी पाणी पाजू नये किंवा रुग्णालयात दाखल करू नये, राणा कुटुंबीयांची मदत करणाऱ्यांना जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे वस्तीतील एकही नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावला नाही आणि दोघाही भावांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जनआक्रोश उफाळून आला आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यासह संपूर्ण वस्ती डोक्यावर घेतली होती. पोलिसांना जमावावर अनेकदा लाठीमारही करावा लागला.

प्रशांत चमके हा मागील पंधरा वर्षांपासून समतानगर परिसरात राहतो. समतानगर हा परिसर अविकसित असून या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. जमिनीवर भूखंड पाडून अनधिकृतपणे लोकांना विकण्यात आले. या ठिकाणी राहणारे बहुतांश लोक हे मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि विदर्भातील ग्रामीण भागातील मजूर आहेत. कामाच्या शोधात नागपुरात आलेले हे मजूर या वस्तीत दहा, पंधरा हजारांची जागा घेऊन छोटय़ा-छोटय़ा झोपडय़ा करून राहू लागले. बांधकाम, खोदकाम करणारे हे मजूर दिवसभर घराबाहेर असतात. त्यांच्या महिला घरी असतात. शिवाय दिवसभर अंगमेहनत करणारे मजूर रात्री दारू पिऊन थकवा घालविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रशांत चमकेने त्या ठिकाणी अवैध दारू विक्रीचा अड्डा सुरू केला. याशिवाय गांजासारखे मादक पदार्थही तो विकू लागला. लोक नशेच्या आहारी गेल्याने तो त्यांच्यावर विविध अत्याचार करायचा. वस्तीत राहणाऱ्या महिलांवर डोळे टाकायचा.

प्रशांतच्या घरात नेहमीच गावगुंडांची वर्दळ असल्याने वस्तीतील लोकही त्याला दबकून राहायचे. अशाप्रकारे वस्तीत त्याची दहशत पसरत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार आदी प्रकारचे गुन्हे दाखल असतानाही चिरीमिरीसाठी पोलीसही त्यालाच साथ देत होते. त्यामुळे गेल्या पंधरा वषार्ंत त्याने वस्तीवर प्रचंड दहशत निर्माण केली. त्याच्याकडून आजवर झालेल्या विविध अत्याचाराविरुद्ध लोकांच्या मनात खदखदत असलेला द्वेष १३ आणि १४ जूनला पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या माध्यमातून उफाळून आला. परंतु अजूनही लोकांच्या मनातील

दहशत हद्दपार झाली नाही. प्रशांतविरुद्ध साक्षीदार शोधताना पोलिसांना परिश्रम घ्यावे लागत आहेत, यावरून लोकांच्या मनात घर करून बसलेली त्याची दहशत स्पष्ट होते.

‘लोकांनी साक्ष देण्यासाठी समोर यावे’

प्रशांत चमके आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध राणा बंधूच्या खुनाच्या प्रत्यक्ष साक्षीदारांनी समोर यावे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आल्यास आरोपींना शिक्षा होईल आणि तो आजीवन कारागृहाच्या कोठडीत सडेल. अन्यथा, तो न्यायालयातून सुटल्यानंतर पुन्हा वस्तीत परतण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे साक्षीदारांनी समोर येऊन पोलिसांना सहकार्य करावे.