गोंदिया : गोंदिया वनपरिक्षेत्रात रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या जेसीबी चालकाला सदर काम थांबविण्याकरिता सांगितले असता त्यांनी गोंदिया वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. वनपरिक्षेत्राधिकाऱ्याला २०/३० फुटापर्यंत फरपटत घेऊन गेले असल्याची घटना गोंदिया तालुक्यात काल रात्री भाडूटोला जंगलात घडली. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया वनपरिक्षेत्रातील काही वनकर्मचारी सोबत गस्त करीत असताना भाडूटोला जंगल परिसरात वनविभागाचे राखीव वन गट क्रमांक ९२५ मध्ये अवैध रित्या जेसीबी मशीनने झाडे झुडपे तोडून मुरूम खोदकाम करीत असल्याचे दिसून आले.
मोक्यावर जाऊन जेसीबी चालवित असलेल्या व्यक्तीस व इतर एका जेसीबी चालकासोबत असलेल्या व्यक्तीस विचारपूर करीत असताना त्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी सोबत गैरवर्तणूक केली. त्याला प्रसंगी वाहना जवळ जाऊन गाडी थांबविण्याबाबत सांगितले असता अचानकपणे गाडी सुरू करून वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांचे अंगावर गाडी चालविण्याचा प्रयत्न केला व २०/३० फुटापर्यंत फरकटत घेऊन गेले.गोंदिया जिल्ह्यात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या विरोधात वन विभागाने धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. ही कारवाई करीत असताना वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी जीव धोक्यात घालणारा पाठलाग केला आहे. गोंदिया वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी जीव धोक्यात टाकून अवैध उत्खन करणाऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता जेसीबी चालकाने व त्यांचे सोबत असलेल्या व्यक्तीने बळजबरीने जेसीबी वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
सदर जेसीबी वाहन १५ ते २० किलोमीटर पर्यंत पळून घेऊन गेले. जेसीबी मशीन व आरोपी यांना पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता रात्री ३ वाजता पासून त्यांचा पाठलाग करण्यात येऊन पहाटे ४:३० वाजता जेसीबी मशीन खातीया गावाजवळ पकडण्यात आले. पण जेसीबी चालक व त्याचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्यावर वन गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.
ही कार्यवाही गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक पवन जोग, सहायक वनसंरक्षक अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी केली. सदर दोन्ही जेसीबी चालक आरोपीचे नाव दिनेश महारवाडे जेसीबी चालक आणि कृष्णा फुंडे जेसीबी मालक असे असल्याचे वनविभागाने सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात मुरूम किंवा इतर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. काल रात्री एका कारवाईत जेसीबी चालकांनी वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. पण अशा अवैध उत्खनन करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी घाबरणार नाही. आम्ही आपले कर्तव्य करीत राहणार. दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी, गोंदिया