गोंदिया : देवरी येथील एम.आय.डी.सी. मधील सुफलाम कंपनी परिसरात असलेल्या सिमेंट विट कारखान्यात एका मजुराचा सिमेंट विटा बनविणाऱ्या मशीन मध्ये होरपळून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रंजीत सदाराम सोनटक्के (वय ३८, रा. पिंडकेपार/गोटाबोडी. ता.देवरी) असे मृत मजुराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम येथे सुफलाम कंपनी असून या परिसरात सिमेंट विटा बनवण्याचा कारखाना आहे. सायंकाळी अंदाजे ५:३० वाजे दरम्यान सिमेंट मिक्सर साफ करीत असताना, अपघात घडला. रणजीत जखमी झाला. प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे भरती केले. पुढील उपचाराकरिता गोंदियाच्या खाजगी रुग्णालय येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने गोंदियावरून नागपूरला उपचाराकरिता नेत असताना, भंडारा जवळ त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती देवरी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.

ट्रकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू

गोदिया तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सालईटोला रस्त्यावर १९ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सलाईटोला ते गोंदिया रस्त्यावर ट्रक चालकाने त्याचा ट्रक (क्रमांक सीजी ०४/८३९४) उभा केला होता. दरम्यान, सलाईटोला येथील रहिवासी राजू साधुराम मर्सकोल्हे (५२) यांचा मुलगा सुरेंद्र मर्सकोल्हे (१९)हा त्यांच्या वाहनाने (क्रमांक एमएच ३५/एझेड ४१६४) जात असताना रस्त्यावर उभा असलेला ट्रक त्यांना दिसला नाही आणि त्यांनी त्याला धडक दिली. ज्यामध्ये रवींद्र मरसकोल्हे मृत व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी केटीएस रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. ही घटना १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सुमारास घडली. तक्रारीच्या आधारे दवनीवाडा पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी आमगाव तालुक्यातील सरकारटोला येथे सायंकाळच्या सुमारास घडली.आमगाव तालुक्यातील सरकारटोला येथील देवलाल सोबीलाल रहांगडाले (४९) असे मृत शेतक-याचे नाव आहे.

धावत्या रेल्वेगाडीतून पडून बालकाचा मृत्यू

धावत्या रेल्वेगाडीतून तोल गेल्याने १५ वर्षीय बालकाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना मुंडीपार शिवारात घडली. मृताचे नाव नितीश अकलू सदा (१५), रा. मसुरी बिहार असे आहे. बिहार राज्यातील सनखेरी येथील धर्मेंद्र दिनेश सदा (२२) याच्यासोबत त्याचा नातलग नितीश अकलू सदा (१५) हा दरभंगा एक्स्प्रेसने जात होता. दरम्यान नितीश हा मुलगा आपल्या सीटवरून उठून बोगीच्या दाराच्या बाजूला उभा होता. दरम्यान मुंडीपार नजीक त्याचा तोल गेल्याने तो रेल्वेगाडीच्या खाली पडला. यात त्याचा मृत्यू झाला. तक्रारीच्या आधारे डुग्गीपार पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.