गोंदिया:- राजकारणात एकाच कुटुंबातील एकाच आडनावाचे दोन प्रमुख व्यक्ती वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षात असल्याचे अनेक उदाहरण आहेत. असंच काहीसं प्रकार गोंदिया जिल्ह्यात पण घडलेला आहे. गोंदिया विधानसभेतून १९९५ आणि १९९९ अशा सलग दोन निवडणुका संयुक्त शिवसेना पक्षातर्फे जिंकणारे माजी आमदार रमेश संपतराव कुथे शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी आहेत. तर त्यांचे सुपुत्र माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य रुपेश (सोनू) रमेश कुथे यांची नुकतीच शिवसेना (शिंदे) गटाच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील राजकारणात हा चर्चेचा विषय झालेला आहे. या पिता-पुत्र संदर्भात एक महत्त्वाचे की हे दोघेही एकाच घरी एकाच छताखाली वास्तव्य करतात.
राजकारणात प्रत्येक व्यक्ती आपल्या हिशोबाने आपले राजकीय भविष्य कुठे सुरक्षित राहणार यावरून भविष्याची दिशा ठरवतो. या अनुषंगाने पुढील तीन ते चार महिन्यात गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात नगरसेवक होऊ पाहणाऱ्या नेतेमंडळीचे जिल्ह्यात प्रभावी असणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे )गट, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) अशा पक्षात प्रवेश करण्याचे सत्र गेल्या काही दिवसा पासून सुरू झालेले आहेत. अशातच वडील माजी आमदार असलेले रमेश कुथे,काका माजी नगर सेवक राजकुमार कुथे शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी असताना त्यांचे सुपुत्र रुपेश (सोनू) कुथे यांची शिवसेना (शिंदे) गटाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड ही काहीशी आजच्या परिस्थितीत आगळी वेगळी ठरणारी राजकीय घटना गोंदिया जिल्हा करिता ठरत आहे.
राज्य पातळीवर बघितल्यास ठाकरे गटातून बरेच नेते मंडळी शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश करत असल्यामुळे या दोन्ही पक्षातील नेते मंडळी एकमेका विरुद्ध सातत्याने आगपाखड केली जात असल्याचे अनेक उदाहरण राज्य पातळीवर दिसून येतात. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या पक्षात राहून एकाच घरी एका छताखाली कसं काय वास्तव होऊ शकतो हा पण गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या अनुषंगाने होणाऱ्या राजकीय चर्चेत लोक वेगवेगळ्या विचारसरणीच्या देश पातळीवर कधीकाळी प्रमुख पदी असलेल्या आणि सध्या हयात नसलेले ग्वालियर घराण्याचे काँग्रेस पक्षात आजीवन असलेले माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया आणि भाजप पक्षात महत्त्वपूर्ण पदी असलेल्या राजमाता विजयाराजे सिंधिया या माता सुपुत्राचे दाखले देतात. तर राज्य पातळीवर नागपूर येथील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार सतीश चतुर्वेदी आणि त्यांचे सुपुत्र शिवसेना (उबाठा) चे दुष्यंत चतुर्वेदी यांची पण चर्चा याप्रसंगी केली जाते.