नागपूर : जंगलातून बाहेर पडलेल्या अस्वलाने लगतच्याच शेतात घुसखोरी केली. ते अस्वल एवढ्यावरच थांबले नाही तर शेतातील अंजनाच्या झाडावर ते चढले.तब्बल बारा तास ते झाडावरच बसून होते. चढताना ते चढले, पण अस्वलाला खाली उतरता येईना. अखेर वनखात्याची चमू त्याठिकाणी आली. पण त्यांनाही अस्वलाने चांगलेच परिश्रम घ्यायला लावले. तब्बल बारा तासाच्या अथक परिश्रमानंतर ते खाली आले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील मौजा जानाटोला येथील गोरेगांव कोहमारा रोडचे बाजुला असलेल्या श्री बुधराम नत्थु दमाहे, रा. भडंगा (शेत सरहद घोटी) यांच्या शेतामधील आंजनच्या झाडावर वन्यप्राणी अस्वल चढुन बसुन असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी गोरेगांव श्री मनोज गडवे यांनी संपुर्ण स्टाफसह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व त्यानुसार कोणताही अनुचीत प्रकार घड्डु नये याकरीता श्री. पिपरेवार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गोरेगांव यांचे सहकार्याने घटनास्थळी बंदोबस्त लावण्यात आला व असलेल्या परिस्थतीनुसार वन्यप्राणी अस्वलवर दिवसभर पाळत ठेवण्यात आली. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पशुधन विकास अधिकारी गोरेगांव, तसेच श्री सावनजी बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था, यांचे उपस्थीतीत जलद बचाव पथक नवेगांवबांधचे चमुने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मनोज गडवे, यांचे मार्गदर्शनात वन्यप्राणी अस्वल करीता जंगलाचे दिशेने जाण्याकरीता मार्ग मोकळा करुन दिला.
जंगलातून बाहेर पडलेल्या अस्वलाने लगतच्याच शेतात घुसखोरी केली. ते अस्वल एवढ्यावरच थांबले नाही तर शेतातील अंजनाच्या झाडावर ते चढले.तब्बल बारा तास ते झाडावरच बसून होते. चढताना ते चढले, पण अस्वलाला खाली उतरता येईना. अखेर वनखात्याची चमू त्याठिकाणी आली. पण त्यांनाही अस्वलाने चांगलेच… pic.twitter.com/wUvqLylOQU
— LoksattaLive (@LoksattaLive) June 29, 2025
सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ते अस्वल खाली आले. वनखाते व पोलीस खात्याने त्याठिकाणी गर्दी होऊ दिली नाही. काही अनुचित प्रकार घडू नये याच त्यांनी काळजी घेतली होती. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार न घडता अस्वल खाली उतरले आणि जंगलामध्ये निघुन गेले. अस्वलाच्या कचाट्यात सापडल्यानंतर जिवंत असण्याची शक्यता फारच कमी असते. अस्वलाच्या हल्ल्यातून व्यक्ती वाचली तरीही अवस्था वाईटच असते. या प्राण्याला साधे रंग दिसत नाहीत, पण भडक रंगांकडे ते लवकर आकृष्ट होतात. त्यामुळे वाघ जेवढा धोकादायक तेवढेच अस्वल देखील धोकादायक असते. शेतातील झाडावरच या अस्वलाने ठाण मांडल्यानंतर शेतकरी देखील घाबरला. ते कोणत्याही क्षणी खाली उतरेल याची भीती असल्याने शेतातील काम ठप्प पडले होते. मात्र, तब्बल बारा तासांच्या झाडावरील मुक्कामानंतर ते खाली उतरले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.