बुलढाणा : हिंदूंनी हिंदू म्हणून जगावे, सध्याच्या काळात हिंदू लोकसंख्येचे संतुलन कायम ठेवणे गरजेचे आहे. हिंदूंचा लोकसंख्या दर झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे हिंदूंनी दोन किंवा तीन अपत्य जन्माला घालावे, असे कळकळीचे आवाहन विश्व हिंदू परिषदचे पश्चिम क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी येथे केले. ‘लव्ह जिहाद’ हे हिंदू धर्मीयांसमोरील मोठे संकट असून हिंदू मुलींनी या षडयंत्रापासून सावध राहणे काळाची गरज आहे. सरकारने गोहत्या प्रतिबंधक कायदा आणखी कठोर करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

बुलढाणा येथील पत्रकार भवनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने गुरुवार, १० एप्रिलला प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसमवेत त्यांनी विविध संवेदनशील विषयांवर संवाद साधला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री माधव धुंदाळे, बजरंग दलाचे संयोजक डॉ. मयूर करे, विश्व हिंदू परिषदचे शहराध्यक्ष उत्कर्ष ढाकणे उपस्थित होते.

आज हिंदूंच्या मुली ‘लव जिहाद’ला बळी पडत आहे. त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पाच ते सहा अपत्यांना जन्म देण्यास बाध्य केले जात आहे. याद्वारे आपली संख्या वाढविली जात आहे. आपल्या मुलींना ‘लव जिहाद’ला बळी न पडू देता त्यांना ‘दुर्गा वाहिनी’मध्ये सामील करावे, जेणेकरून त्यांचा बळी जाणार नाही. सध्या गोहत्या तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. गोहत्या तस्कर प्रकरणांमध्ये वाहन किंवा वाहन चालक पकडल्या जातो. त्यांच्यावर कारवाई होत नाही. गोहत्या तस्करीमध्ये जे वाहन आढळून येते, त्या वाहन मालकावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच अपराध्याला किमान दहा वर्षाची शिक्षा करावी, अशी आमची सरकारकडे परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे.

हिंदूंवर चोहोबाजूनी आक्रमणे

देशातील हिंदूंवर ज्याप्रकारे आक्रमणे होत आहे. जाळपोळ होत आहे, वैयक्तिक व देशाची संपत्ती नष्ट होत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून हे कृत्य केल्या जातात त्यांच्याकडून नष्ट झालेल्या संपत्तीचे पैसे वसूल करावे. म्हणजे ते पुन्हा असे करण्यास धजावणार नाही. यासह हिंदू मंदिराच्या सर्वकश सुरक्षेची मागणी देखील सरकारकडे केली आहे, अशी माहितीही शेंडे यांनी दिली.