-महेश बोकडे

वैद्यकीय शिक्षण खाद्यात बाह्यस्त्रोत पद्धतीने परिचारिकांच्या नियुक्तीला विरोधसह इतर मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने गुरूवारपासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे उपराजधानीतील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी या तीन्ही शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. येथील सामान्य वार्डात परिचारिकाच नसल्याने नियोजित शस्त्रक्रिया स्थगित होत असून रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र आवश्यक काळजी घेतल्याचा दावा केला जात आहे.

परिचारिकांच्या कामबंद आंदोलनाचा सर्वाधिक फटका सुपरस्पेशालीटी रुग्णालय, मेडिकल रुग्णालयाला बसला. तर मेयो रुग्णालयात कामबंदमध्ये निम्याच्या जवळपासच परिचारिका असल्याने तेथे तुलनेत कमी त्रास झाला. तिन्ही रुग्णालयांतील परिचारिका बुधवारी मध्यरात्री १२ वाजतानंतर कामावरून निघून गेल्या. या पाळीत परिचारिका आंदोलनावर जाणार असल्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून एमएससी नर्सिंग, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसह नाॅन क्लिनिकलचे निवासी डॉक्टरांसह संपावर नसलेल्या परिचारिकांच्या आधीच सेवा लावल्या होत्या.

दरम्यान अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होणाऱ्या अतिदक्षता विभाग, अपघात विभागासह ट्रामा केअरमध्ये संपावर नसलेल्या प्रशिक्षीत परिचारिकांच्या सेवा लावण्यात आल्या आहेत. तर इतर सामान्य वार्डात नाॅन क्लिनिकल विषयाच्या निवासी डॉक्टरांसह व्यवसायोपचार व भौतिकोपचार विषयातील विद्यार्थ्यांच्या सेवा लावण्यात आल्या आहेत. परंतु बऱ्याच वार्डात सकाळपासून परिचारिकाच नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. येथे रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास प्रचंड मन:स्ताप होत आहे. तर काहींनी नातेवाईकांनाच रुग्णांची स्वच्छतेपासून इतर कामे करावी लागत असल्याचे सांगितले. दरम्यान परिचारिकांच्या संपामुळे तिन्ही रुग्णालयातील अनेक नियोजित शस्त्रक्रिया स्थगित झाल्या असून केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच दाखल केले जात आहे.

परिचारिकांच्या संपामुळे एकाही रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने एमएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह नाॅन क्लिनिकलच्या निवासी डॉक्टरांच्या सेवा गरजेनुसार विविध वार्डात लावल्या आहेत. अत्यवस्थ संवर्गातील सगळ्या रुग्णांवर वेळीच उपचाराची सोय आहे. सगळ्या विभाग प्रमुखांकडून रुग्णसेवेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
– डॉ. शिल्पा लांजेवार, (प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल रुग्णालय, नागपूर.)