अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्यावतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हजाराे अनुयायांनी सहभाग घेतला. यावेळी सादर केलेल्या चित्तधरारक प्रात्यक्षिकांनी लक्ष वेधून घेतले.

अकोला शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाची मोठी परंपरा आहे, जी दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केली जाते. ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सोहळ्यात भव्य मिरवणूक, जाहीर सभा आणि हजारो लोकांचा प्रचंड उत्साह असतो. हा सोहळा भारतीय बौद्ध महासभाद्वारे आयोजित केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा अखंडपणे सुरू असून त्यात सातत्याने हजारो लोकांची गर्दी असते.

नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर अनुयायांना अकोल्यातील महोत्सवाचे वेध लागतात. विविध ठिकाणावयन अनुयायी मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. या सोहळ्यात भव्य मिरवणूक, विविध आकर्षक देखावे, लेझीम पथके आणि प्रचंड उत्साह दिसून येतो. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवांतर्गत धम्म मेळाव्याच्या विशाल जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका मांडतात? याकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागून असते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दुपारी रेल्वेस्थानक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी वाजतगाजत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला. शहरातील शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टँड, टिळक मार्ग, शहर कोतवाली, गांधी चौक, बसस्थानक, टॉवर चौक आदी प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत अकोला किक्रेट क्लब मैदानावर मिरवणूक दाखल झाली. एका मोठ्या रथामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले.

या मिरवणुकीत जिल्हाभरातून व्यायाम शाळा, आखाडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला. मिरवणुकीमध्ये आखाड्याच्या युवक-युवतींनी लेझिमपथक, दांडपट्टा, मल्लयुद्ध, तलवारबाजी आदी कलांचे नेत्रदिपक प्रदर्शन केले. मिरवणुकीमध्ये अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. समता सैनिक दलाचे पथसंचलन मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. तसेच विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मिरवणुकीचे स्वागत करून आंबेडकरी अनुयायांसाठी भोजनदान केले. मिरवणूक व धम्म मेळाव्यासाठी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी उसळली.