गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून तापमानाचा पार चांगलाच चढला आहे. यामुळे बहुतांश लग्नसमारंभ हे रात्रीच्या मुहूर्तावरच संपन्न होत आहेत. अशाच एका लग्न सोहळ्यात एक दुर्दैवी घटना घडली. वरातीदरम्यान नवरदेवाच्या बग्गीचे ब्रेक फेल झाले. यामुळे अनियंत्रित झालेली बग्गी वरातीत शिरली. बगीच्या धडकेत वरातीत सहभागी असलेल्या वरपक्षातील एका महिलेचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील लोहारा येथे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

गोपिका भाऊलाल ढोमणे (७०, रा. गोंडमोहाडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया) असे मृत महिलेचे, तर कांताबाई टिकाराम भंडारी (६०, रा. घोटी, ता. गोरेगांव, जि. गोंदिया) असे या घटनेतील जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे की, सालेकसा तालुक्यातील लोहारा येथे मुकेश सहारे यांच्या दोन मुलींचे रविवार, २० एप्रिलला लग्न होते. त्यांच्या निवासस्थानी रात्रीच्या सुमारास आयोजित समारंभासाठी दोन नवरदेव लोहारा या गावी आले होते. त्यात एक गोरेगाव तालुक्यातील झांझिया येथील व दुसरा नवरदेव तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथील होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी रात्रीच्या सुमारास बँडपथक व डीजेच्या तालात नाचतगाजत वरात नवरीच्या घरी जात असताना अचानक नवरदेवाच्या बग्गीचे ब्रेक फेल झाले. यामुळे अनियंत्रित झालेली बग्गी वरातीत शिरली. बगीच्या धडकेत वरातीत सहभागी असलेल्या वरपक्षातील गोपिका ढोमणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कांताबाई टिकाराम भंडारी या जखमी झाल्या. याप्रकरणी बग्गीचालक अंकित कटरे रा.लोहारा यांच्यावर सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सालेकसा ठाण्याचे पोलीस निरीक्षण भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सोंजाल करीत आहेत.