नागपूर : धान्य व्यापारी राजू दिपानी यांच्यावर झालेला गोळीबार आणि ५० लाखांच्या लूटीची घटना विस्मृतीतही जात नाही तोच तोच परिमंडळ तीनच्या पथकाने एका व्यापाऱ्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे इंदोरा चौकात पाठलाग करून पकडली. विशेष म्हणजे ज्या व्यापाऱ्याकडे ही गावठी बंदूक सापडली तो व्यापारी देखील जरिपटका भागातील रहिवासी आहे. त्यामुळे हवालाचा बेहिशेबी पैसा आणि त्यातून वाढणारे वैमनस्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
जरीपटका येथील रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याकडे गावठी पिस्तूल सापपडणे योगायोग असला तरी पोलिसांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. पिस्तूल बाळगणारा व्यापारी चपला- बुटे विकणारा किरकोळ व्यावसायिक आहे. तरीही त्याला जीवाला धोका असल्याच्या भितीने चक्क पिस्तुल बाळगावे, असे का वाटावे, यावरही आता संशय व्यक्त होत आहे.
ईशान गोविंदचंद्र जसनानी (३६, रा. कमल पूल आटा चक्की, जरिपटका) असे गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस, १ रिकामी मॅग्झिन बाळगणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. जीवाला धोका असल्याचे सांगत ईशानने इमरान खान मोहम्मद कादिर खान ( २५, रा. गरीब नवाज चौक खरबी ) याच्या मार्फत हे पिस्तूल आणि काडतुसे विकत घेतली होती.
तहसील परिसरात बुटाचे दुकान चालवणारा ईशान जसनानी हा जरिपटका येथे राहतो. बुटांचा किरळोळ व्यापारी असलेल्या या जसनानी देखील हवालाचा व्यवहार करतो का याचा आता पोलिसांना संशय आला आहे. इतवारीतच्या एका बुटाच्या व्यापाऱ्याने अलिकडेच पिस्तूल खरेदी केल्याचा सुगावा खबऱ्यांमार्फत परिमंडळ तीनच्या पथकाला लागला. पोलिसांनी तहसीलच्या गुन्हे शोध पथकाला माहिती दिली. त्या आधारे पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते.
गुरुवारी सायंकाळी गस्तीवर असलेल्या पथकाला पाहून जसनानी आणि इम्रान हे दोघे एक्टिव्हा दुचाकी घेऊन पळाले. पाठलाग करत पथकाने या दोघांना जरिपटकाकडे जाणाऱ्या इंदोरा चौकात गाठले. पथकाने जसनानीच्या दुचाकीची डिकी उघडून झडती घेतली असता त्यात गावठी बनावटीचे पिस्तूल, आठ काडतूसे असलेली लोड केलेली मॅग्झिन आणि एक रिकामी मॅग्झिन पोलिसांच्या हाती लागली. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आता या दोघांना शस्त्र पुरवठा करणारा सूत्रधाराचा शोध घेत आहेत.