महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : शासनाने एसटी बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. त्याबाबत महामंडळाने गुरुवारी रात्री सर्व विभाग नियंत्रकांना सूचना केली. त्यामुळे महिलांना आजपासून (१७ मार्च) एसटीत निम्या तिकिटात एसटीचा प्रवास करता येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास करणाऱ्या योजनेचे उद्घाटन २५ ऑगस्ट२०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करायला मिळत आहे, तसेच या योजनेमुळे एसटीने प्रवास न करणारे ज्येष्ठ नागरिकही प्रवास करु लागले आहेत.

आणखी वाचा- नागपूर: उपराजधानीत दुसरा ‘एच ३ एन २’ग्रस्ताचा मृत्यू, परंतु मृत्यूचे कारण…

त्यातच आता एसटीत महिलांना १७ मार्चपासून निम्या भाड्यात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे एसटीत महिला प्रवासी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटी मंडळाच्या दररोज चालविण्यात येणाऱ्या सोळा हजार फेऱ्यांद्वारे रोज लक्षावधी महिलांना लाभ होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोरोनाकाळापूर्वी एसटीतून ६५ लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या एसटीचे रोजचे प्रवासी ५५ लाख झाले आहेत. त्यामुळे सर्व २९ प्रकारच्या समाज घटकांच्या प्रवास सवलती देण्यापोटी महामंडळाला दर महिन्याला २२० कोटी राज्यसरकार देणार आहे. तसेच १०० कोटी रूपये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून मिळणार आहे. त्यातच महिलांच्या सवलतीचाही भार सरकार उचलणार असल्याने महामंडळाला दिलासा मिळणार आहे. या वृत्ताला एसटीचे उपव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक ३ श्रीकांत गभने यांनी दुजोरा दिला.