नागपूर : वर्धा मार्गावरील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर एन वर्दळीच्या वेळी सायंकाळी सातच्या सुमारास कारचा भिषण अपघात झाला. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र ज्या कारचा हा अपघात झाला ते वाहन हरियाणा राज्यातील आहे. त्यावर पोलिसांची पाटी लावली होती. त्यामुळे कारच्या अपघातावरून गौडबंगाल निर्माण झाले आहे.
बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एेन वर्दळीच्या वेळी ही कार दुभाजकावर धडकली. धडक इतकी जोरदार होती, की कारच्या उजवीकडील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक मद्यप्राशन करून होता. शिवाय ही कार एका गुप्तचर यंत्रणेशी निगडीत नागपूरात नियुक्त अधिकाऱ्यांची असल्याची माहिती मिळत आहे.
याची खात्री करण्यासाठी बजाजनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानलकर यांच्याशी संपर्क साधला असता, श्वान अडवे आल्याने हा अपघात घडल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कार कोणाची आहे, या बाबत त्यांनी गुप्तता पाळली. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि पोलिसांच्या दाव्यात तफावत असल्याने संशय निर्माण झाला आहे. या बाबत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलीस नेमके कोणाला पाठीशी घालत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
मद्यपी कारचालकाने पाडला खांब
वर्धा मार्गावर सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या कार अपघाताची घटना ताजी असतानाच खापरी पोलीस चौकीसमोर बुटीबोरीकडून नागपूरच्या दिशेने सुसाट निघालेल्या मयूर चंदन ताकसांडे (३०) या कारचालकाने महामार्गावरच्या खांबाला जोरदार धडक दिली. रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास हा अपघात झाला. ही धडक इतकी भिषण होती, की दुभाजकाला लागून असलेल्या खांबाचा सिमेंटचा पाया देखील उखडून पडला. त्यामुळे खांब जमिनीवर कोसळला. सुदैवाने विरुद्ध दिशेने एकही वाहन नसल्याने दुर्घटना टळली. शिवाय ज्या कारचा हा अपघात झाला त्या गाडीतील एअर बॅग उघडली गेल्याने कार चालकही सुदैवाने वाचला. ही कार सरकारी उर्जा कंपनी गेल मधील अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावर घेतलेली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या पांजरी येथील रहिवासी मयूर ताकसांडे हा घटनेच्या वेळी मद्यधूंद अवस्थेत कार चालवत होता, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली.