नागपूर: मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरातून नागपुरातील विविध रुग्णालयांत अचानक मोठ्या संख्येने लहान मुले दाखल झाली. यातील काहींच्या मृत्यूनंतर येथील आरोग्य यंत्रणा प्रकरणाच्या तळाशी गेली व कफ सिरफमुळेच मुले दगावत असल्याची बाब समोर आणली. यानंतर लगेच औषधावर प्रतिबंध घालून पुढचा मोठा अनर्थ टाळता आला. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मदतीला महाराष्ट्रातील नागपुरातील आरोग्य यंत्रणा कशी धावली, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
१५ सप्टेंबरच्या दरम्यान छिंदवाडा, परासिया परिसरातून दीड वर्षे ते ८ वर्षे वयोगटातील मुले अत्यवस्थ अवस्थेत नागपुरातील मेडिकल आणि एम्स या शासकीय रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांत दाखल झाली. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला. रुग्णांची लक्षणे मेडिकल आणि न्यू हेल्थ सिटी रुग्णालयाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना दिली. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी त्वरित या रुग्णालयांत मेट्रो पाॅलिटन सर्व्हिलन्स यूनिट (एमएसयू) पाठवले.
तीव्र मेंदूज्वराची लक्षणे बघत महापालिकेने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला (एनसीडीसू) सूचना दिली. एनसीडीच्या आदेशावरून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील पथकाने नागपुरातील रुग्णांचे नमुने तपासले. त्यात मेंदूज्वराशी संबंध निघाला नाही. मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मनीष तिवारी यांनी रुग्णाची रिनल बायप्सी केली असता त्यात विषाणूचाही संबंध समोर आला नाही. त्यामुळे डॉ. तिवारी यांनी रुग्णांंच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता छिंदवाडातील बहुतांश रुग्णांनी एकसारखे कफ सिरफ दिल्याचे पुढे आले.
लगेच नागपूर महापालिकेच्या माध्यमातून एनसीडीसी आणि छिंदवाडा प्रशासनाला माहिती दिली गेली. त्यानंतर कफ सिरफवर बंदी घालण्यात आली. मध्य प्रदेशातील अन्न व औषध प्रशासनाच्या औषध शाखेला या कफ सिरफमध्ये डायएथिलिन ग्लाइकाॅलचे प्रमाण ४६ टक्के आढळले. हे प्रमाण ०.०१ टक्केच्या वर नको. परंतु, यादरम्यान नागपुरातील विविध रुग्णालयात १७ मुलांचा मृत्यू झाला. सध्या २ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १ जीवनरक्षण प्रणालीवर आहे.
नागपूर महापालिकेचे म्हणणे काय ?
“ छिंदवाडयातून अत्यवस्थ बालके येत असल्याने महापालिकेने ‘एनसीडीसी’ला कळवले. ‘एनसीडीसी’कडून विविध पथके पाठवली गेली. मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनिष तिवारी यांनी कफ सिरफवर शंका घेतली. ही माहिती एनसीडीसी आणि छिंदवाडा प्रशासनाला कळवताच सिरपवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता छिंदवाडयातून रुग्ण येणे कमी झाले आहे.” – डॉ. दीपक सेलोकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नागपूर महापालिका.