गोंदिया : जिल्ह्यात शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी २६ जुलै रोजी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कोसळत राहिला. आज रविवारीही पहाटे पासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.
शनिवार २६ जुलै रोजी सरासरी ५४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गोंदिया तालुक्यातील ८, आमगाव तालुक्यात ४, गोरगाव तालुक्यात १, सालेकसा तालुक्यातील ४. अशा एकूण १७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे गोंदिया तालुक्यात ७५.८ मिमी, आमगाव तालुक्यात ७४.४ मिमी, तिरोडा तालुक्यात २२.९ मिमी, गोरेगाव ४९.२ मिमी, सालेकसा ८४ मिमी, देवरी ४८. ९ मिमी, अर्जुनी मोरगाव ३७. ४ मिमी तर सडक अर्जुनी तालुक्यात ४३. ३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, महसूल, पोलिस विभाग सज्ज आहे.
घर व गोठ्यांची पडझड…
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे घर व गोठ्यांची पडझड सुरू झाली आहे. गोंदिया तालुक्यात १६ घरे अंशतः, ६ गोठे अंशतः, आमगाव तालुक्यात २५ घरे अंशतः तर तीन घर पूर्णतः व ९ गोठे अंशतः, गोरेगाव ५ घर व २ गोठे अंशतः, सालेकसा तालुक्यात १५ घर व ६ गोठे अंशतः, देवरी तालुक्यात ८ घर व ३ गोठे अंशतः, सडक अर्जुनी तालुक्यात ४ घर अंशतः असे एकूण जिल्ह्यात ७३ घरे अंशतः, तीन घर पूर्णतः तर २६ गोठे अंशतः पडल्याची नोंद जिल्हा प्रशासना कडे झाली आहे. याशिवाय अनेक घर जिल्ह्यात क्षतिग्रस्त झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू
मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वेगाने वाढ होत चालली आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धरणातील पाण्याचा विसर्ग प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शिरपुर धरणाचे तीन दार ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. कालीसरार धरणाचे ४ दार० ६ मीटरने, पुजारीटोलाधरणाचे आठ दार १.२ मीटरने, सजय सरोवरचे एक द्वार १.२५ मीटर, धापेवाडा उपसा सिंचनचे ११ दार तीन मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदी, नाल्यांना पुर आला असून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील ४५ मार्ग आज ही बंदच
मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ते बंद पडले आहेत. यामुळे अनेक गावे संपर्काबाहेर गेली आहेत. यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरी ते माडोखाली, राजोली ते इळदा, पवनी ते रामपुरी, वडेगाव ते मोरगाव, केशोरी ते खानखुर्रा, येरंडी ते सिलेशरी, रामपुरी ते धाबेपवनी, कवठा ते येरही, सुरगाव ते मुंगली, बोडगावदेवी ते बाराभाटी. गोंदिया तालुक्यातील सोनबिहरी ते नवेगाव, आमगाव तालुक्यातील आसोली ते जांभुरटोला, सुपलीमार ते बंजारीटोला, सुमलीपार ते कालीमाटी, जामखारी ते धावडीटोला, रावणवाडी ते कालीमाती, गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव ते बोटे, सालेकसा तालुक्यातील सोनपुरी ते पाथरी, बंजारी ते रखीली, डहाराटोला ते जमाकुडो, धानोली ते आमगाव, दंहारी ते मुरकूडोह, पानगाव ते कहाली, निंबा ते मुरूमटोला, सालेकसा ते नानव्हा, मसकाखांदा ते कुलरभट्टी, रामाटोला-पिपरीया, भजेपार ते अंजोरा, नवेगाव ते लटोरी, जमाकुडो ते गोपालगड, साखरीटोला सालेकसा. देवरी तालुक्यातील डवळी ते शिलापूर, आवरीटोला ते गोटाबोडी, मुरदोली ते आमगाव, देवरी ते बिल्लारगोदी, चिचेवाडा ते मासुलकसा, अंभोरा ते निलज ते केशोरी-खामखुर्रा, गणुटोला ते ककोडी, पळसगाव ते तुमडीमेढा, आलेवाडा ते गडेगाव, कडीकसा ते कलकसा.
सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला ते घोटी, चिंगी ते कोकणा, घटेगाव ते गिरोला, घटेगाव ते हेटी असे जिल्हयातील ४५ रस्ते पाण्यामुळे बंद पडले होते. या रस्त्यावरील पुलावरून पाणी तसेच नाले दुथडी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.