अकोला : अकोला, वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र जलमय वातावरण झाले. सखल भागामध्ये पाणी साचले असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आणखी सात दिवस पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. रिमझिम पडणारा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी पोषक ठरत आहे. आणखी पाऊस पडल्यास शेतामध्ये पाणी साचून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला. सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर दोन दिवसांपासून रिमझिप पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन झाले नाही. काही ठिकाणी पावसाने जोर पकडला. पावसाचे पाणी ठिक-ठिकाणी साचले आहे. नागरिकांच्या घरामध्ये रस्ते, नाल्यातील पाणी शिरले. दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, आता काही दिवस उघाड पडण्याची गरज आहे, मात्र जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली.
सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणी साठ्यात वाढ झाली. जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा, निर्गुणा, काटेपूर्णा, मन, पठार, गौतमा आदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक २६.६ मि.मी. पाऊस पडला, तर अकोला तालुक्यात १३.५ मि.मी. पाऊस पडला. अकोटमध्ये १२.४, तेल्हारा ९.४, पातूर १२.२, बार्शिटाकळी १७.५, तर बाळापूर तालुक्यात १३.१ मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पामध्ये २७ मि.मी. पाऊस झाला असून २४.०६ टक्के जलसाठा झाला. वान प्रकल्पामध्ये ३३.४१ टक्के, मोर्णा प्रकल्पामध्ये ५०.६१ टक्के, निर्गुणा प्रकल्प १०० टक्के, उमा प्रकल्प ११.५३ टक्के भरला आहे. दगडपारवा प्रकल्प २५.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
वाशीम जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक कारंजा तालुक्यात २१.८ मि.मी. पाऊस झाला. वाशीम तालुक्यात ९.३ मि.मी., रिसोड ९ मि.मी., मालेगाव १७.०५ मि.मी., मंगरुळपीर १७.४ मि.मी., मानोरा १३.१ मि.मी. पाऊस झाला. या महिन्यात वाशीम जिल्ह्यामध्ये ८९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.