अकोला : अकोला व वाशीम जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यांमध्ये कोसळधारा सुरू आहेत. नदी, नाल्या दुथडी भरून वाहत असून काही मार्ग देखील बंद झाले. पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले आहे. अकोल्याील टिळक मार्गावर एका मोठा खड्ड्यातून नालीत पडल्याने एक जण वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. प्रशासनाकडून शोध व बचाव कार्य सुरू आहे. वाशीम जिल्ह्यात वाहत्या पाण्यातून पुलावरून येतांना जनावरे वाहून गेली. त्याची चित्रफित प्रसारित झाली आहे.
हवामान विभागाने २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता. शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने चांगलाच जोर पकडला. रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर शनिवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले आहे. शहरातील टिळक मार्गावर जुना कपडा बाजार परिसरात एका मोठ्या खड्ड्यातून नालीत एक व्यक्ती कोसळल्याची घटना घडली.
पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. याची माहिती मिळताच मनपाचे पथक व अग्निशमन विभागाने घटनास्थळावर धाव घेऊन शोध मोहीम व बचाव कार्य सुरू केले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.९ मि.मी. पाऊस पडला. बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक ४३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. मूर्तिजापूर २९.७, अकोला १६.२, पातूर २१.९, बाळापूर १.८, अकोट तालुक्यात १.५ मि.मी. पाऊस पडला. या खरीप हंगामात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
वाशीम जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील इंझोरी परिसरामध्ये विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. एका घराचा जिना कोसळला. बाजूच्या भिंतीला देखील तडा गेल्या आहेत. हिवरा बु येथे नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या ठिकाणी चार गायी आणि दोन बैल वाहून गेले आहेत. वाशीम ते मैराळडोह रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. जाम ते मंगरूळपीर आणि पांगरी ते अमानी हे रस्ते देखील पुरामुळे बंद झाले आहेत.