गोंदिया : जिल्ह्यात शुक्रवार मध्यरात्री ११:३० पासून आणि शनिवार, २६ जुलैच्या सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग काही तास सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शनिवार, २६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण संस्थांना बंद ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरला आहे. दरम्यान, धरणांवरही अतिरिक्त दबाव टाळण्यासाठी कालीसरार, पुजारीटोला आणि धापेवाडा प्रकल्पांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी व नाल्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत.
शहरातील एकमेव बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दोन ते तीन फुट पाणी साचल्यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी खबरदारीचा इशारा दिलाय. पूरग्रस्त भागात प्रवास टाळा, घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घ्या, आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी जाणे टाळ्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील कालीसरावर पुजारी टोला धरणाचे वक्रद्वार उघडले
गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे धरण नियंत्रणाकरिता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे ८ वक्रदवार ०.६ ने विसर्ग सुरू करण्यात आले आहे. यामधून २३२.२२ क्युमेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कालीसरार धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे ४ वक्रदवार ०.३ मी. ने विसर्ग करण्यात आले. देवरी तालुक्यातील सतत चालू असणाऱ्या पावसामुळे शिरपूर धरणाची पातळी वाढली आहे. सध्या मौजा शेडेपार ते कन्हागाव नाला एक फूट रस्त्यावरून भरून जात आहे. तसेच डवकी ते शिलापूर, आवरीटोला ते गोटाबोडी, पिंडके पार ते गोटाबोडी, मुरदोली ते आमगाव, देवरी ते बिल्लारगोंदी चिचेवाडा हे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील हे मार्ग बंद…
चिचगड परिसरातील मौजा आंभोरा निलज ते केशोरी खामखुरा मार्ग बंद, गणूटोला ते ककोडी, पळसगाव ते तुंबडीमेंढा, आलेवाडा, मोहगाव ते गडेगाव आणि कडीकसा ते कलकसा मार्ग बंद करण्यात आले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिलेझरी ते एरंडी, मांडोखाल ते बोरी, महालगाव ते वडेगाव, सुरगाव ते मुंगली, बोंडगाव देवी ते बाराभाटी, रामपुरी ते धाबेपवणी, कवठा ते येरंडी जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.