नागपूर ग्रामीणमध्ये पावसाचा जोर कायम असताना मंगळवारी रात्रीपासून शहरात देखील मुसळधार पावसाचा वेग वाढला. या पावसामुळे गोरेवाडा धरण पूर्णपणे भरले असून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहरातील अंबाझरी तलाव देखील ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे.

मंगळवारी रात्रीपासून शहरात पावसाचा वेग वाढला. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले. वाठोडा परिसरातील काही झोपड्यांमध्ये पाणी शिरले. ओमनगर, बेसा या परिसरातही पाणी शिरले. मानेवाडा, वर्धमाननगर, हुडकेश्वर, त्रिमूर्तीनगर या परिसरात झाडे कोसळली. शहरातील पिवळी नदी दुथडीभरून वाहत असल्याने खबरदारी म्हणून या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासंदर्भात अधिकृत आदेश नसला तरीही काही शाळांनी स्वतः पालकांना मुलांना शाळेत न पाठवण्याचा संदेश पाठवला आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.