नागपूर: दोन वर्षापूर्वी नागपुरातच आणि संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन दिले होते, मात्र आता मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे सरकारने प्रथम आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, असे स्पष्टमत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. लाखो मराठा बांधव मुंबई दाखल झाले आहेत, मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी दिवसेंदिवस सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी नागपुरात जरांगेच्या दबावाला सरकारने बळी पडू नये म्हणून दबाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. सावनेरचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांसह संविधान चौकात उपोषण मंडपाला भेट दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार परिणय फुके हे सुद्धा उपोषण मंडपाला भेट देणार आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधाव मुंबईत येऊन धडकेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
काय म्हणाले तायवाडे ?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, दोन वर्षापूर्वी याच संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या उपोषण मंडपाला भेट देऊन ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले होते. आता पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. जरांगे यांनी आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही जेंव्हा स्वत:ला ओबीसी म्हणतो तेंव्हा त्यात महाराष्ट्रातील चारशेंहून अधिक जातींचा समावेश होतो. मुस्लिमांसह इतरधर्मियांचाही त्यात समावेश आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत ६० टक्के असलेल्या ओबीसींना फख्त २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यातही कोणी डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, वेळ पडली तर आम्हीही मुंबईत जाऊन आंदोलन करू,असे बबनराव तायवाडे म्हणाले.