लोकसत्ता टीम
नागपूर : दोघांनी कुटुंबाचा विरोध झुगारून घरातून पलायन करीत मंदिरात जाऊन एकमेकांना हार घालून प्रेमविवाह केला. मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध मावळला. घरात नवीन पाहुणा येणार असल्यामुळे दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण होते. दोघांचा सुखी संसार सुरु असतानाच गरोदर मातेची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर घरी आली आणि तिने पोलिसांना फोन केला. तासाभरात पोलीस आले आणि त्यांनी पतीला अटक केली. त्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला.
गर्भवती मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नसल्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्याचे सांगताच पत्नीने रडारड सुरु केली. अशाप्रकारने कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याचे सांगून पोलिसांनी दोघांच्या संसारात विघ्न घातले.
आणखी वाचा-गडचिरोली पोलिसांचा तस्करांना दणका
आरोपी हर्षद मांढरे (१९, तुमसर, भंडारा) हा बेरोजगार असून जानेवारी महिन्यात कामाच्या शोधात पारशिवनीला आला होता. पीडित १७ वर्षीय मुलगी तनुजा (बदललेले नाव) हिच्या वडिलाने त्याला आपल्याकडे कामावर ठेवले. यादरम्यान ठेकेदाराची मुलीशी ओळख झाली. ठेकेदार हा नेहमी जेवनाचा डबा आणण्यासाठी हर्षदला कामावरून घरी पाठवत होते. यादरम्यान, हर्षद आणि तनुजा यांचे एकमेकांवर प्रेम जडले. तिचे वडिल घरी नसल्यावर ते दोघांची भेट होत होती. त्यावेळी तनुजा ही नवव्या वर्गात शिकत होती. तनुजाने त्याला लग्न करण्याची गळ घातली. ३१ मे २०२२ रोजी हर्षदने तिच्या वडिलांकडे लग्नासाठी तनुजासाठी मागणी घातली. मात्र, त्यांनी विरोध केला. त्यामुळे दोघांनीही सहमतीने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा-अल्पवयीन पीडितेचा अमानवीय छळ प्रकरण: ‘त्या’ मुलीवर सख्ख्या भावानेही केला बलात्कार
कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनीही पारशिवणीतील एका मंदिरात लग्न केले. लग्न केल्यानंतर ४ महिन्यांतच कुटुंबियांना गोड बातमी दिली. त्यामुळे त्यांचा विरोध मावळला. त्यांना गावात परत बोलावले आणि त्यांचा सुखी संसार सुरु झाला. आरोग्य तपासणीसाठी घरी आलेल्या आशा वर्करने गर्भवती तनुजाचे आधारकार्ड मागितले आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असून गर्भवती असल्यामुळे पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केला.