बुलढाणा: रस्ते सुधारणा झाली, राष्ट्रीय व राज्य महामार्गची संख्या वाढली असली तरी जिल्ह्यातील वाहन अपघातांची दुर्देवी मालिका संपायला तयार नाही. याच मालिकेत आज मंगळवारी, १३ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहे. मृतकमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. चौघा जखमीवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नजिक झालेल्या या भीषण अपघाताचा विस्तृत तपशील येथे अजून प्राप्त झाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा वळण मार्गा जवळ (बायपास नजिक) ही भीषण दुर्घटना घडली. भरधाव वेगातील मालवाहू वाहन (ट्रक ) आणि इर्टिका कारची धडक झाल्याने हा अपघात आज मंगळवारी हा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या मुलाचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार अपघातात ठार झालेले कुटुंब मराठवाडा विभागातील आहे. हे कुटुंब लोकरवाडी तालुका माहूर , जिल्हा नांदेड येथील राहणारे आहे.
देवराम गंगाराम पवार ( वय ६० वर्षे ), बबीता देवराव पवार (वय ५५ वर्षे ) आणि निकेतन देवराव पवार (वय २६वर्षे ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. इर्टिका कार मधील अन्य चौघे प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खामगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले आहे . त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
मृतदेह काढायला लागले दोन तास
आज मंगळवार, १३ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मृतदेह कारमधून काढण्यासाठी २ तास प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी धाव घेऊन मदत कार्य राबवले.ओम साई फाउंडेशन च्या स्वयंसेवकांनी देखील मदत कार्याला हातभार लावला. अपघात स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघात झाल्याची माहिती झाल्यावर घटना स्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मृत आणि जखमीच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. मृतदेह अक्षरश चेपल्या गेल्याने व जखमी गंभीर असल्याने मृत, जखमी यांचा तपशील मिळण्यात विलंब लागला.