अकोला : वंचित आघाडीने दिलेला मसुदा महाविकास आघाडीने मान्य केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. त्याचे आम्ही स्वागत करतो. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यांचा मसुदा आम्हाला द्यावा. त्यामुळे कुठल्या मुद्द्यावर आपले एक मत आहे हे कळेल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे मांडली.

अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीत अंतर्गत काय चालू आहे, ते आम्हाला माहिती नाही. आम्ही म्हणालो होतो की, आम्हाला तुमच्या अंतर्गत समावेश करून घ्यायचा असेल, तर तशी इच्छा आमची आहे आणि अधिकार त्यांचा आहे. समावेश करून घ्यायचा नसेल, तर तुमची आधी चर्चा होऊ द्या मग आम्ही वैयक्तिकरित्या पक्षांशी चर्चा करतो. आमचा मसुदा त्यांनी मान्य केला, याचे आम्ही स्वागतच करतो. महाविकास आघाडीने त्यांचा अंतर्गत मसुदा एकमेकांना दाखवला असेल, तो आम्हाला दाखवावा, असे आमचे म्हणणे आहे.

हेही वाचा – सरकारने आरक्षण दिले, आता जरांगेंनी अट्टहास सोडावा – देवेंद्र फडणवीस

वंचितची अगोदरपासून ही भूमिका आहे की, सगळे पक्ष सगळ्या प्रश्नांवर एकत्र येतील असे नाही. कोणत्या प्रश्नावर आपण विभागलो जातो आणि कोणत्या प्रश्नावर आपण एकत्र येतो, याची जाणीव पक्षांना असली पाहिजे. महाविकास आघाडीच्या २७ तारखेच्या बैठकीचे निमंत्रण अजून तरी आम्हाला आलेले नाही. निमंत्रण आले, तर आम्ही बैठकीला जाणार आहोत. २८ तारखेअगोदर त्यांनी मसुदा आम्हाला सांगितला तर, पुढच्या बैठकीमध्ये निर्णय घ्यायला सोपे जाईल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हावर वडेट्टीवार म्हणाले, “तुतारी वाजवायला ‘हात’… ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागा वाटपाचा आराखडा अद्याप पाठवला नाही

‘मविआ’च्या तीन घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे. त्याचा वंचित आघाडीशी संबंध नाही. आमचा जागा वाटपाचा आराखडा अद्याप गेलेला नाही, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मविआमध्ये वंचित बहुजन आघाडी निमंत्रित आहे. अद्याप आघाडीचे घटक नाही. जागा वाटपामध्ये तीन पक्षांत नेमक्या कुठल्या जागा कोणाकडे गेल्या याची आम्हाला कल्पना नाही, याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले.